केरी-पेडणेत १७ कोटीचे काम पाण्यात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

ॲग्रेसिव्ह गोवन्सचा आरोप, निकृष्ट दर्जामुळे संरक्षक भिंत कोसळली, चौकशीची मागणी

पेडणे: केरी-पेडणे येथे समुद्र किनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीची दुर्दशा झाली असून, अवघ्या चार वर्षांतच १७ कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही संरक्षक भिंत जागोजागी वाहून गेल्याने सरकारचे पैसे पाण्यात गेले आहेत. निकृष्ट दर्जाचे हे काम केल्याने जबाबदार असलेल्या जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ॲग्रेसिव्ह गोवन्स या संघटनेने फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी या संघटनेचे संतोष तारी तसेच ओंकार नाईक व नीतेश गावकर व इतर सदस्य उपस्थित होते.

 

केरी-पेडणे येथील समुद्र किनाऱ्याची कायम धूप होत असल्याने हा किनाराच धोकादायक बनला होता. किनाऱ्याची धूप होऊ नये यासाठी पदपथवजा संरक्षक भिंतीचे बांधकाम या किनारपट्टीवर घेण्यात आले. सुमारे दीड किलोमीटर अंतराचे हे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चार वर्षातच जागोजागी कोसळले असून आता नव्याने या कामाची दुरुस्ती करण्यासाठी ५ कोटीची निविदा काढण्याचे घटत आहे. शंभर वर्षांची हमी देणाऱ्या या कामाची अवघ्या चार वर्षांत वाट लागली असून बांधकाम जागोजागी कोसळले असल्याने निकृष्ट कामाची लक्तरेच वेशीवर टांगली गेली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जनतेच्या पैशांचा चुराडा कशाप्रकारे केला जातो, याचे हे उत्तम उदाहरण असून सरकारने याबाबतीत कारवाई करण्याची अपेक्षा लोकांकडून होत आहे.

 

हे काम करणारा संबंधित कंत्राटदार तसेच जलस्त्रोत खात्याचा पेडणे विभाग १ उपविभाग ३ चा तत्कालीन सहायक व कनिष्ठ अभियंता यांची आधी चौकशी करण्याची जोरदार मागणी ॲग्रेसिव्ह गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हे काम सुरू असताना ते निकृष्ट दर्जाचे चालल्याची ओरड होत असताना देखील त्याकडे सरकारने डोळेझाक केली, त्यामुळे अल्पावधीतच जनतेचे पैसे पाण्यात गेले आहेत. आता नव्याने या कामाची दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे ती संबंधित कंत्राटदाराच्या पैशांनी की जनतेच्या पैशांनी हे आधी स्पष्ट करा, असे यावेळी सांगण्यात आले. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी येथील सध्या स्थिती असून या निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्यासंबंधीची मागणी ॲग्रेसिव्ह गोवन या संघटनेने दक्षता खात्याकडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या