Beaches in Goa : समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षारक्षकांत करणार वाढ

रोहन खंवटे यांची किनारपट्टी भागातील आमदारांबरोबर घेतली बैठक
Goa Beaches
Goa BeachesDainik Gomantak

Beaches in Goa : गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने व राज्याचा महसुलाचा कणा असल्याने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने पर्यटक सुरक्षा कर्मचाऱ्यांची वर्णी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून देखरेख ठेवली जाणार आहे. समुद्रकिनाऱ्यांवर आवश्‍यक साधनसुविधा तसेच पर्यटक मदत केंद्रे स्थापनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी किनारपट्टी परिसरातील आमदारांच्या बैठकीनंतर दिली.

किनारपट्टी लाभलेल्या मतदारसंघांच्या आमदारांच्या त्या किनारपट्टीच्या भागातील असलेल्या समस्या यासंदर्भात सूचना करण्यासाठी मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन भवनात बैठक बोलावली होती. या बैठकीला किनारपट्टी असलेल्या 12 आमदारांपैकी 10 आमदारांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीतील अधिक माहिती देताना मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, बहुतेक समुद्रकिनाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे अजूनही बसवण्यात आलेले नाहीत. समुद्रकिनाऱ्यांवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या पर्यटक सुरक्षारक्षकांची संख्या कमी आहे. 105 किलोमीटर लांब असलेल्या समुद्रकिनाऱ्यासाठी खात्याकडे फक्त 70 पर्यटक सुरक्षारक्षक आहेत. त्यांना कारवाईचे अधिकार नाहीत. त्यामुळे कोणतीही कारवाई करायची झाल्यास पोलिसांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्यातील पर्यटन दर्जा वाढवण्यासाठी सर्व घटकांतील लोकांना एकत्र येण्याची गरज आहे.

पर्यटनाचा दर्जा वाढवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील शॅक धोरण, जलक्रीडा, पर्यावरण पर्यटन तसेच पर्यटक सेवा देण्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

Goa Beaches
Land Grabbing Case : तपासाला वेग; बार्देश ‘मामलेदार’चा चालक गजाआड

पर्यटन खात्यातर्फे गाईडना प्रशिक्षण

समुद्रकिनाऱ्यांवर फेरीवाले, विविध सेवा उपलब्ध करून देणारे दलाल तसेच गाईड्स आहेत ते बंद होण्याची गरज आहे. त्यासाठी खात्यातर्फे या गाईड्ससाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. त्यांनाच समुद्रकिनारी पर्यटकांना गाईड करण्याचा परवाना असेल. समुद्रकिनाऱ्यांवरील अनैतिक व्यवसाय तसेच गाईड्स आढळून आल्यास त्याला संबंधित क्षेत्रातील पोलिस उपअधीक्षकाला जबाबदार धरण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com