शेतकऱ्यांनी स्वतः स्वयंपूर्ण होणे हेच ‘आत्मनिर्भर

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

शेतकऱ्यांनी आपल्या पायावर उभे राहाणे हेच आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे उद्दिष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर म्हणाले. फातर्पा येथे आयोजित कृषी मेळाव्यात ते बोलत होते.

नावेली:  शेतकऱ्यांनी आपल्या पायावर उभे राहाणे हेच आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे उद्दिष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर म्हणाले. फातर्पा येथे आयोजित कृषी मेळाव्यात ते बोलत होते.

फातर्पा श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण सभामंडपात आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस,‌ कृषी खात्याचे संचालक नेव्हील अफोन्सो, फातर्पाच्या सरपंच मंदा देसाई, कुंकळ्ळीचे उपनगराध्यक्ष विदेश देसाई, स्टेट बँकेच्या शिवानी नायक, माजी पंच आणि शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रदीप नाईक देसाई, कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई, आत्माचे प्रकल्प संचालक शिवराम नाईक गांवकर आणि सत्यवान देसाई उपस्थित होते. 

यावेळी कृषी मंत्री कवळेकर म्हणाले, किसान क्रेडिट कार्ड चा लाभ सर्वांनी घेणे आवश्यक आहे, कारण नियमित हप्ते फेडल्यास विना हमीदार १.६ लाखाचे हे कर्ज शून्य व्याजदरात मिळते. तसेच शेतकी खाते बऱ्यापैकी आता सक्रिय झालेले आहे. सर्व सेवा शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी क्षेत्रीय कृषी कार्यालयात न जाता, आठवड्यातून एक दिवस नजीकच्या पंचायतीत येऊन सेवा देण्याचे कार्य करत आहेत. यावेळी त्यांनी बार्शे आणि खोला इथे गूळ आणि खोला मिर्ची प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे जे प्रधान मंत्र्यांचे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याने आत्म निर्भर होणे गरजेचे आहे. शेतकरी जर आत्मनिर्भर झाला तर त्याच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.

या कार्यकमात भाषण करताना कुंकळ्ळीचे आमदार क्लफासिओ डायस यांनी स्वतःवर कोविड चा मारा झाला. त्यावेळी त्यांनी घेतलेली काळजीबद्दल माहिती दिली. कृषी संचालक नेव्हील आफोन्सो यांनी शेतकऱ्यांना वाढीव पीक घ्यावे ह्यासाठी प्रोत्साहित केले. ह्या कार्यक्रमासाठी शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानाने मोफत सभामंडप उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान कमिटीचे आभार मानले. यावेळी मांडलेल्या प्रदर्शनाला एकूण १०विविध शेतकी  विक्रेत्यांनी आपले स्टॉल्स लावले होते व बऱ्याच मालाची विक्रीही केली.

‘किसान क्रेडिट कार्ड’बद्दल
स्टेट बँकेतर्फे मार्गदर्शन

स्टेट बँकेच्या लीड बँक मॅनेजर शिवानी नायक यांनी या मेळाव्यात शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, आपण गोवेकरांना कर्ज घेणे आणि ते फेडणे याबद्दल भीती वाटते. बदलत्या युगात टिकून राहण्यासाठी हातात तरल पैसे असणे गरजेचे असते. किसान क्रेडिट कार्ड मार्फत हे विना हमी आणि वेळेत कर्ज फेडल्यास विना व्याज मिळते ज्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या