टाळेबंदीच्या काळात ज्येष्ठांवर ताण

तेजश्री कुंभार
बुधवार, 17 जून 2020

कोरोनाच्‍या लक्षणाबाबत माहिती नसणारे ज्‍येष्‍ठ ९ टक्‍के, अस्‍थमा, मधुमेह, रक्‍तदाब, कर्करोगसारख्‍या आजारांचे प्रमाण वाढलेले ज्‍येष्‍ठ ६२ टक्‍के, एकटेपणाचा अनुभव वाढल्‍याचे सांगणारे वृध्‍द ६१ टक्‍के, आरोग्‍यसेवा न मिळालेले रुग्ण ६० टक्‍के आहे.

पणजी,

जेव्‍हा शरीर थकू लागते, तेव्‍हा मनही थकायला सुरू होते आणि मग ताण यायला सुरुवात होते. टाळेबंदीच्‍या कालावधीत अनेकजण मानसिक तणावाला सामोरे गेले. आयुष्‍याची संध्‍याकाळ घालविणारे ज्‍येष्‍ठही टाळेबंदीच्‍या काळात तणावात जगले. कोविड १९ चा धोका तर त्‍यांना होताच शिवाय ६५ टक्‍क‍े ज्‍येष्‍ठांची रोजीरोटीही टाळेबंदीच्‍या काळात गेली, ज्‍यामुळे त्‍यांना इतरांप्रमाणेच उपासमारी सहन करावी लागल्‍याचे दाहक सत्‍य हेल्‍प एज इंडिया या संस्‍थेने देशपातळीवर केलेल्‍या सर्व्हेतून उघडकीस आलेय.
संस्‍थेने गोव्‍यासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्‍ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्‍मू अँड काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्‍यप्रदेश, महाराष्‍ट्र, ओडिसा, पाँडेचरी, पंजाब, राजस्‍थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, बंगाल यासारख्‍या राज्‍यातील ५०९९ ज्‍येष्‍ठांचा सर्व्हे केला. यात २६३९ शहरी तर २४६० ग्रामीण भागातील तर ५७ टक्‍के पुरुष आणि ४३ टक्‍के महिलांचा समावेश होता.
६५ टक्‍के ज्‍येष्‍ठांना जर त्‍यांची रोजीरोटी गमवावी लागली असेल तर भारतासारख्‍या प्रगतिशील देशात ज्‍येष्‍ठ नागरिक आजही स्वतःचे पोट भरण्‍यासाठी घाम गाळत असल्‍याचे सिद्ध होते. या ६५ टक्‍क्‍यांमध्‍ये ६० टक्‍के ग्रामीण तर ४० टक्‍के शहरी भागातील ज्‍येष्‍ठ होते. ज्‍यांच्‍या रोजीरोटीचा प्रश्‍‍न निर्माण झाला त्‍यांच्‍यामध्‍ये ६७ टक्‍के लोक ६० ते ६९ वयोगटातील तर २८ टक्‍के ज्‍येष्‍ठ ७० ते ७९ वयोगटातील आणि ८० च्‍या पुढे वय असणारे ५ टक्‍के ज्‍येष्‍ठ होते.
आरोग्‍याच्‍या बाबतीत हा सर्‍व्‍हे अतिशय महत्त्‍वाची माहिती देतो. टाळेबंदीच्‍या काळात ४२ टक्‍के वृद्धांच्या आरोग्‍याबाबतच्‍या समस्‍यांमध्‍ये वाढ झाली. हे प्रमाण शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात ३६ टक्‍क्‍यांनी अधिक आहे.
७८ टक्‍के वृध्‍दांना जगण्‍यासाठी लागणाऱ्या वस्‍तू किंवा गोष्‍टी आणण्‍यासाठी समस्‍यांना सामोरे जावे लागले. यामध्‍ये प्रामुख्‍याने जेवणाची, अन्‍नधान्‍याची, औषधांची, घरकामातील मदत, एटीएम सेवा यासारख्या गोष्‍टींच्‍या उपलब्धतेबाबतच्‍या समस्‍या असल्‍याचे या सर्व्हेतून लक्षात येते.
 

भिती वाढली!
या टाळेबंदीच्‍या कालावधीत वयोवृद्धांना ३ प्रकारची भीती प्रामुख्‍याने सतावत असल्‍याचे या सर्व्हेमुळे समोर आले आहे. यामध्‍ये ३८ टक्‍के वृद्धांना आपल्‍याला कोरोना तर होणार नाही ना... याबाबतची भीती त्रास देत होती. आपल्‍याकडे असणारे मिळकतीचे साधन तर आपल्‍याकडून जाणार नाही ना... मग जगायचे कसे... पैसा कोठून आणायचा यासारखे प्रश्‍‍न ३४ टक्‍के वृध्‍दांना सतावत होते तर १२ टक्‍के लोकांना प्रवासाची भीती वाटत होती. यामुळे कोरोनाची लागण तर होणार नाही ना...असा प्रश्‍‍न वृध्‍दांना सतावत असल्‍याचे सर्व्हे सांगतो.

संबंधित बातम्या