'डीएसएसवाय' योजनेतील लाभार्थ्यांच्या आर्थिक साहाय्यासाठी बँकेत फेऱ्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

या योजनेचे असलेले लाभार्थी हे ज्येष्ठ नागरिक असून ते वयोवृद्ध आहेत. या लाभार्थींना दरमहा दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य मिळते मात्र गेल्या चार महिन्यांपासून ते मिळालेले नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

पणजी-  कोविड-१९चा फटका राज्याच्या अनेक कल्याणकारी योजनांना बसला आहे. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील (डीएसएसवाय) ज्येष्ठ नागरिकांना गेल्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचे आर्थिक साहाय्य मिळालेले नाही. बँकांमध्ये हे आर्थिक साहाय्य जमा झाले आहे का यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मात्र हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. हल्लीच झालेल्या ज्येष्ठ नागरिक दिनी मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांची थकबाकी देण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही.  

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसंदर्भात समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या योजनेखालील लाभार्थींच्या आर्थिक साहाय्याची बिले दरमहिना वेळोवेळी लेखा खात्याकडे पाठविली जातात. या खात्याकडून विलंब होत नाही तर लेखा खात्याने ती मंजूर करण्याची आवश्‍यकता आहे. या योजनेचे असलेले लाभार्थी हे ज्येष्ठ नागरिक असून ते वयोवृद्ध आहेत. या लाभार्थींना दरमहा दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य मिळते मात्र गेल्या चार महिन्यांपासून ते मिळालेले नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. काहीजण हे या योजनेच्या आर्थिक साहाय्यावर अवलंबून असतात. या आर्थिक साहाय्याचा वापर औषधे विकत घेण्यासाठी काहीजण करतात. ही मदत बँकेच्या खात्यात जमा झाली का याची खातरजमा करण्यासाठी हे वयोवृद्ध विचारपूस करण्यासाठी बँकेत वारंवार हेलपाटे मारत आहेत व पैसे अजूनही जा का झाले नाहीत असा सवाल करत असल्याने बँक अधिकारीही हैराण झाले 
आहेत.ज्यात सुमारे सव्वा लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची या योजनेखाली नोंद आहे.

या योजनेखाली नव्या ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज घेतले जात असले तरी ते मंजूर करण्यात आलेले नाही. या अर्जदारांची पडताळणीचे कामही सध्या स्थगित ठेवण्यात आले आहे. सध्या जे आहेत त्यांनाच वेळेवेर आर्थिक साहाय्य देणे सरकारच्या नाकीनऊ येऊ लागले आहे. सरकारी कल्याणकारी योजना बंद केल्या जाणार नाही असे सरकार सांगत आहे मात्र या योजनांखालील लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक साहाय्य कित्येक महिने मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हे लाभार्थी बहुतेक गरीब कुटुंबातील आहेत ज्यांना कोणतेच इतर उत्पन्न नाही. त्यांना मिळणारे हे आर्थिक साहाय्य औषधोपचार तसेच स्वतःच्या वापरासाठी उपयोग करतात. हे आर्थिक साहाय्य महिनोमहिने दिले गेले नाही यासंदर्भातचे वृत्त गणेशचतुर्थीच्या पूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने मे २०२० या एका महिन्याचे आर्थिक साहाय्य या ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले होते. त्यानंतर आता पुन्हा चार महिन्यांची थकबाकी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली नाही. 
 

संबंधित बातम्या