एसजीपीडीएची पालिकेला नोटीस: मडगाव मार्केटजवळील कचरा त्वरित हटवा

वार्ताहर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटच्या पाठीमागे सुका कचरा साठवून ठेवण्यात आल्याने त्यात पावसाचे पाणी झिरपून आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

नावेली: एसजीपीडीएच्या किरकोळ मार्केटच्या पाठीमागे सुका कचरा साठवून ठेवण्यात आल्याने त्यात पावसाचे पाणी झिरपून आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आता एसजीपीडीएने मडगाव पालिकेला निर्वाणीचा इशारा देताना या कचऱ्‍याची त्वरित विल्हेवाट लावावी. अन्यथा त्या जागेत कचरा साठवून ठेवण्यासाठी जी परवानगी दिली होती ती मागे घेऊ अशा आशयाची नोटीस मडगाव पालिकेला पाठविली आहे.

या ठिकाणी साचलेल्या कचऱ्‍यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एसजीपीडीए मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सुका कचरा साठवून ठेवण्यात आला आहे.
मडगाव पालिका दारोदारी कचरा गोळा करण्याची मोहीम यशस्वी राबवित असली, तरी केवळ ओला कचरा वेळेवर उचलला जात आहे, तर सुका कचरा वेळेवर उचलला जात नाही, अशा तक्रारी पालिकेत मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या आहेत. पालिका सफाई विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुका कचरा गोळा करण्यासाठी ज्या पिशव्या वापरल्या जातात, त्या संपल्याने कचरा उचल व्यवस्थित होत नाही.

नगराध्यक्षा पुजा नाईक यांना विचारले असता त्यांनी सुका कचरा उचलण्यासाठी वापरात येणाऱ्या पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाची पूर्वीची बिले न फेडल्याने पिशव्यांचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सुका कचरा गोळा करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत, असे सांगितले.

संबंधित बातम्या