हणजूण पार्टीप्रकरणी शैलेश शेट्टीला अटक; बंगल्याच्या मालकाचीही होणार चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

वैयक्तिक पार्ट्यांच्या नावाखाली रेव्ह पार्ट्या शैलेश शेट्टी याच्या मदतीने करत असल्याचे उघड झाल्यावर शेट्टी याची गेल्या काही दिवसांपासून क्राईम ब्रँच चौकशी करत होते. आज त्याला चौकशीसाठी बोलावून अटक करण्यात आली.

पणजी: हणजूण येथील फिरंगी पानी बंगल्यावरील रेव्ह पार्टी आयोजित करण्यात बॉलिवूड स्टार कपिल झवेरी याच्यासह सनबर्न क्लासिक सहआयोजक शैलेश शेट्टी याचाही हात असल्याने गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने त्याला अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. या बंगल्याचा मालक दिल्ली येथील असून त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 

बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित असलेला संशयित कपिल झवेरी याने फिरंगी पानी बंगला प्रतिमाह पावणेदोख लाख रुपयांच्या भाडेपट्टीवर घेतला होता. वैयक्तिक पार्ट्यांच्या नावाखाली रेव्ह पार्ट्या शैलेश शेट्टी याच्या मदतीने करत असल्याचे उघड झाल्यावर शेट्टी याची गेल्या काही दिवसांपासून क्राईम ब्रँच चौकशी करत होते. आज त्याला चौकशीसाठी बोलावून अटक करण्यात आली. रेव्ह पार्ट्या आयोजनामध्ये या दोघांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत समोर आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

संशयित कपिल झवेरी याचा गोव्यातील तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी पतसंस्थेशी संबंधित असल्याने ते सुद्धा क्राईम ब्रँचच्या रडारवर आहे. या पतसंस्थेमधील पैशाचा वापर मनी लॉँडरिंगसाठी केला जात आहे का याबाबत पोलिसांना संशय आहे मात्र अजून त्यासंदर्भात चौकशी सुरू झालेली नाही. किनारपट्टी भागातील इतर हॉटेल वा क्लबशी संबंध आहे का या दिशेनेही चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या रेव्ह पार्ट्यामध्ये गुंतलेल्यांच्या मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी कऱण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी संशयित कपिल झवेरी याच्याशी संबंध असलेल्यांच्याही जबान्या नोंदवण्यासाठी तयारी केली आहे 

दरम्यान, तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी पतसंस्थेमध्ये गोव्यातील हजारो लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत. संस्थेच्या बहुतेक शाखा या दक्षिण गोव्यात आहेत. संस्थेच्या या कारभारात राजकारणीही आहे. केपे, सांगे व काणकोण या भागातील अनुसूचित जमातीच्या समाजाच्या काही तरुणांनी भरमसाट व्याज मिळत असल्याने पैसे जमा केले आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या