
चोपडे आगरवाडा पंचायत क्षेत्रांतील शापोरा नदीकाठालगत असलेल्या खारफुटी व अन्य झाडांची खुलेआम कत्तल केल्याची स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर आज वनअधिकाऱ्यांसमवेत सरपंच अँथनी फर्नांिडस यांनी पाहणी केली. दरम्यान,अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सरपंच अँथनी फर्नांडिस यांनी सांगितले, की खारफुटीची कत्तल केल्याची माहिती मिळताच आपण स्वतः वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. आपणही उपस्थित होतो. परंतु या घटनेत झाडांची कत्तल झाल्याचे कुठे दिसले नाही. मात्र मातीचा भराव टाकण्यात आला आहे. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आणि सदर माती कोण टाकत आहे? याची माहिती मिळवली जाईल.
वनविभागाचे अधिकारी जितेंद्र नाईक यांनी सांगितले, की झाडांची कत्तल झाल्याचे दिसून आले नाही. मात्र, खारफुटीच्या झाडांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आला आहे. सीआरझेड विभाग व पंचायत कोणत्या कारणासाठी डोळेझाक करत आहे. संबंधित हॉटेल मालकावर त्वरित कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोले यांनी केली आहे.
दरम्यान, मांद्रे मतदारसंघात परप्रांतीय व्यक्तींनी विशेषतः मांद्रे,जुनसवाडा,मोरजी,आश्वे आदी भागात, ज्याप्रकारे डोंगर, नदी नाल्यांचा केलेला विद्ध्वंस पाहता, गोव्यात कायद्याचे राज्य नसल्याची खात्री झाली आहे,असे कोले म्हणाले. सदर हॉटेल दिल्लीस्थित व्यावसायिकाचे असून, संबंधितावर कारवाई करण्याची गरज आहे,असे संजय कोले यांनी सांगितले.
‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी अन् अनधिकृत बांधकामे !
चोपडे आगरवाडा पंचायत क्षेत्रात कित्येक बांधकामे, मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. स्थानिक लोकांच्या घरांना दुरुस्ती व अन्य वैध कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात, पंचाचे पाय धरावे लागतात. मात्र निर्बंधित क्षेत्रात कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून अवैध बांधकामे उभारली जातात व पंचायत सदस्य मूग गिळून गप्प राहतात, यावरून ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी होतात,याचा अंदाज येतो,असे मत संजय कोले यांनी व्यक्त केले.
‘सुट्टी’ची संधी साधून पर्यावरणाची हानी !
सुट्टी असल्याची संधी साधून,सदर व्यावसायिकाने जेसीबी घालून संपूर्ण भागात माती पसरवली व नैसर्गिक झाडे मातीत गाडल्याने पर्यावरणाचे नुकसान केले आहे.मानशीचे पाणी व त्यातील झाडे अक्षरशः उपटून काढली तर अनेक झाडे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली हा अतिरेक असून संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी कोले यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.