आठवणीतील भाऊसाहेब बांदोडकर

डॉ. सीताराम विठ्ठल कोरगावकर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

गोव्याचे भाग्यविधाते, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची नुकतीच पुण्यतिथी झाली. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख. 

गोव्याचे भाग्यविधाते, पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची नुकतीच पुण्यतिथी झाली. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख. 
गोवा पोर्तुगीजांच्या फाशात गुदमरत असतानाच्या काळी श्रीयुक्त भाऊसाहेब बांदोडकर या महान व्यक्तीचा साध्या घराण्यात जन्म झाला. लहानपणीच आईवडिलांचे छत्र हरपले. तरी न डगमगता स्वतःच्या प्रगतीकडे वाटचाल करीत राहिले. आपल्या गोवा राज्याचे नाव जगभर केले. एक प्रसिध्द उद्योगपती व गोवा संघराज्याचे केंद्रशासित पहिले मुख्यमंत्री झाले.

स्वतःचे एक जिवंत उदाहरण गोव्यातील जनतेच्या डोळ्यासमोर ठेवत ते १२ ऑगस्ट १९७३ रोजी अनंतात विलीन झाले. त्यांचे नाव व किर्ती प्रत्येक नवीन पिढीच्या स्मरणात चिरकाल राहणार आहे. कारण भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे भाग्यविधाते होय. भाऊसाहेब बांदोडकरांना मी लहानपणी प्रत्यक्ष बघितले आहे. आम्ही शाळेचे शिक्षण घेत असताना सर्वांच्याच तोंडात भाऊसाहेबांचे नाव असायचे. भाऊसाहेब मला अजूनही आठवतात ते त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या दोन घटनामुळेच. या दोन्ही घटना आज माझ्या डोळ्यासमोर ताज्या आहेत. पहिली घटना, त्यांच्या हस्ते पार पडलेला बक्षीस वितरण सोहळा, श्री भगवती मंदिर, पेडणे येथे झालेला, दुसरी घटना म्हणजे मी अनुभवलेली त्यांची निवडणूक प्रचारसभा, श्री कमळेश्र्वर मंदिर, कोरगाव.

१९६८-६९ सालची घटना असेल. मी मराठी सातवी इयत्तेत शिकत होतो. शिक्षण खात्यातर्फे मराठी हस्तलिखित स्पर्धा आयोजित केली होती. माध्यमिक वर्गाच्या मराठी विद्यार्थ्यांसाठी ती स्पर्धा होती. आमच्या शाळेने त्यात भाग घेतला. भाग घेण्याचे मुख्य कारण, शाळेत नवीनच रूजू झालेले रावजी जाधव यांची प्रेरणा होती. हे गुरुजी चित्रकलेचे उत्तम शिक्षक होते व त्यांचे हस्ताक्षर सुंदर व टपोरे असे. त्यांच्या व हेमा रेगे बाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुंदर हस्तलिखित तयार केले. त्यांचे नाव ठेवले ‘उषःकाल हस्तलिखित’ व ते स्‍पर्धेसाठी पाठविले. आमची सरकारी प्राथमिक शाळा पेठेचावाडा - कोरगाव या शाळेला दुसरे बक्षीस मिळाले ही अत्यंत आनंदाची गोष्ट होती. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना व गुरूजी वर्गाला. पहिले बक्षीस सरकारी प्राथमिक शाळा मेस्तवाडा कुर्टी या शाळेला मिळाले.

नंतर आमचे सर्व शिक्षक वर्ग त्यांचे हस्तलिखित बघायला मुद्दाम कुर्टीला गेले होते. बक्षीस प्रदान कार्यक्रम पेडणे येथे भगवती मंदिरात ठेवला होता. यावेळी भाऊसाहेब बांदोडकर हजर होते. त्यांच्या हस्ते आमच्या शाळेला प्रमाणपत्र व काही रोख रक्कम दिली गेली होती.

दुसरी घटना ही भाऊसाहेबांची निवडणुकीची प्रचारसभा. स्थळ होते श्री कमळेश्‍वर मंदिर, कोरगाव. गोवा संघ राज्याची ती गोवामुक्तीनंतरच्या काळातील तिसरी निवडणूक. १९७२ साली पहिली निवडणूक १९६३ साली झाली. दुसरी निवडणूक १९६८ साली झाली होती. भाऊंच्या समर्थकांकडून जाहीर सभेची वार्ता वाऱ्यासारखी गावभर पसरली होती. प्रत्येक घरातून कोणी ना कोणी व्यक्ती सभेसाठी जात असे. कारण कोणत्या एखाद्या घरातून जर कोणी सभेला गेलं नाही तर त्या घरातील मतदार त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही असा अप्रत्यक्ष शिक्का बसत असे.

माझे हायस्कूल मंदिरापासून हाकेच्या अंतरावर होते. हायस्कूल सुटल्यानंतर मंदिराच्या आवारातून घरी जाणे हे ठरलेले असायचे. तेथे गर्दी बघितल्यावर कळले की इथे भाऊसाहेब बांदोडकर येणार आहेत. मला त्यांना बघण्याचे मोठे कुतुहल होते. मी व माझा मित्र तेथे थांबलो. काही वेळाने मुख्यमंत्र्यांची लाल दिव्याची गाडी एकदम येऊन उभी राहिली. मुख्यमंत्री शुभ्र पांढरा सदरा, पायजम्यात होते. गाडीतून उतरले. मंदिराला मुख्य कमानीतून आत शिरल्या शिरल्या तेथे एक मोठा ढोल (नौबत्तीचा) टांगलेला होता. त्या ढोलावर त्यांनी ढाण करून छान थाप मारली. त्या ढोलातून आलेल्या ध्वनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासमवेत माझ्या माहितीप्रमाणे रमाकांत खलप होते. खलपांची ती पहिली सार्वजनिक सभा असावी. खलपांची ओळख त्या सभेत सुरू झाली असावी. नक्की आठवत नाही.
भाऊसाहेबांनी आपल्या प्रचाराच्या भाषणात खलप यांचा वकील व मांद्रे गावाचा भाचा अशी ओळख करून दिली होती हे नक्की आठवते. सभेला भरपूर गर्दी होती. भाऊ जायला निघाले तर त्यांच्या वाटेवर गरीब लोकांचे कळप दिसायचे. भाऊसाहेब गरीब किंवा साधा माणूस दिसला की त्याला आर्थिक मदत दिल्याशिवाय कधीच पुढे जात नसत. भाऊसाहेबांनी नंतर आपल्या पायजम्यातील खिशात हात घालून हाताला येईल ते बंडल बाहेर काढले व त्यातील नोटा हातात येतील तशा न मोजता जमलेल्या गोरगरीबांना  देत राहिले. मी हे सर्व बघून थक्क झालो.

गरीब, अशिक्षित लोक आपली कैफियत घेऊन त्यांच्याजवळ मांडत असताना सांगत, ‘भाऊ, माझ्या मुलाला किंवा मुलीला शिक्षणासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी मदत करा’’ हे हक्काने सांगणे म्हणजे भाऊंवर विश्‍वास ठेवणे होते. भाऊ त्यांना नाराज न करता त्यांना मदतीचा हात देऊन वर काढण्यासाठी प्रयत्न करीत. ते दलितांचे कैवारी होते. गोरगरीबांचे प्रश्‍न ते जातीने लक्ष घालून सोडवत असत. कित्येक छोटी मोठी मंदिरे चॅपेल त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधून दिली. कित्येक वयस्क लोक अजून भाऊंच्या अशा अनेक आठवणी काढतात.

भाऊसाहेबांनी सर्वात प्रथम इ.स. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर भारत स्वातंत्र्य लढ्यात, गोवा मुक्तीसंग्रामात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. गोव्याच्या स्वतंत्र सैनिकांमधील भाऊ एक स्वातंत्र्यसैनिक होते. भारत स्‍वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनाला चालना मिळाली. या गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेऊन अनेक भूमीगताना सर्वप्रकारचे सहकार्य दिले. खेडोपाडी पोर्तुगीजाविरूध्द प्रचार केला. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला. ११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केला. त्यानंतर १९६३ साली भाऊसाहेबांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा हा महाराष्ट्रात विलीन करावा अशा मताचे ते पुरस्कर्ते होते, पण त्यांची इच्छा अपुरी राहिली. गोव्यातील जनतेने त्यांच्या प्रयत्नांना कडाडून विरोध केला.

१६ जानेवारी १९६७ रोजी जनमताचा कौल घेण्यात आला. जनमतावेळी एकूण ३१७६३३ मतदारांनी मते दिली. त्यापैकी ५४.२० टक्के मते विलीनीकरणाच्या विरुध्द बाजूने  व ४३.५० मते ही विलीनीकरणाला पसंत करणारी मते झाली. अशाप्रकारे जनमताच्या आधारानुसार गोवा विलीनीकरणापासून वाचला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. त्यानंतर एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत मगो पक्ष बहुमताने निवडून आला. 

गोवा मुक्‍तीनंतर १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत भाऊसाहेबांच्या पक्षाने एकूण ३० पैकी १४ जागा जिंकल्या व तीन अपक्षांच्या मदतीने बहुमत सिध्द करून महाराष्‍ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. भाऊसाहेबांनी ती निवडणूक लढविली नव्हती. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही ख्याती होती. 

त्यानंतर एप्रिल १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाऊसाहेब महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीत बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांनी ५ वर्षांचा आपला कार्यकाळ सुरळीतपणे पूर्ण केला. त्यानंतर १९७२ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्येसुध्दा बांदोडकर बहुमताने निवडून आले व तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. शशिकला काकोडकर या त्यांच्या ज्येष्ठ कन्या त्यावेळी भाऊसाहेबांच्या मंत्रिमंडळात सदस्य होत्या. त्यांनीच नंतर वडिलांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली.

भाऊसाहेब बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा साडेदहा वर्षांच्या राजकीय प्रवासात उत्तम इतिहास घडविला. गोव्यात अनेक सुधारणा केल्या, गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अनेक योजना व कार्यक्रम राबविले. शेती, मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले. गोव्यातील उद्योगांना चालना दिली. साहित्य, कला क्षेत्रात उत्तेजन आणले. गोव्यात कला अकादमीची स्थापना केली.

शैक्षणिक व क्रीडाविषयक क्षेत्रात पुढाकार घेऊन संस्थांना सढळ हातांनी मदत केली. गोवा पर्यटन क्षेत्र बनावे म्हणून खूप योजना तयार केल्या व त्या कार्यान्वित केल्या. क्रिकेट, फुटबॉल, शिकार, वाचन, सुग्रास भोजन त्यांना मनापासून प्रिय होते. भाऊसाहेब खूप रसिक होते. तसेच राजस मनाचे होते. १२ ऑगस्ट १९७३ रोजी अचानक त्यांना ह्रदयविकाराच झटका आला व मुख्यमंत्री पदावर असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊसाहेब बांदोडकरांसारखे अद्वितीय व नेतृत्वाची दैवी देणगी असलेले पुरुष परत होणे नाही. असे मला वाटते.

(लेखक गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त सहप्राध्यापक आहेत)

संबंधित बातम्या