थिवी पंचायतीच्या सरपंचपदी शर्मिला गडेकर बिनविरोध

वार्ताहर
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

थिवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शर्मिला गडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ११ पंचसदस्य असलेल्या पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने सुनिता साळगावकर या सरपंच होत्या.

थिवी:  थिवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शर्मिला गडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ११ पंचसदस्य असलेल्या पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने सुनिता साळगावकर या सरपंच होत्या. मध्यंतरी थिवीत राजकीय समीकरणे बदलू लागली व त्यातच ६ पंचसदस्यांनी एकत्र येऊन सरपंच सुनिता साळगांवकर यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल केला.  १५ जुलै रोजी ठराव संमत झाला. नव्या सरपंचपदी निवड करण्यासाठी  १२ रोजी सकाळी १०.३० वाजता थिवी ग्रामपंचायत सभागृहात पंचसदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. उपसरपंच संदीप कवठणकर, पंचसदस्य लियो परेरा, मायकल फर्नांडिस, विठ्ठल वांयगणकर, युगेश सातर्डेकर व शर्मिला गडेकर उपस्थित होते. तर पंचसदस्य सुनिता साळगांवकर, अर्जून आरोसकर, शिवदास कांबळी, तृप्ती शिंदे व समीक्षा मयेकर हे पंचसदस्य गैरहजर राहिले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयातील संदीप आपुले हे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते. 

निर्वाचन अधिकाऱ्यांनी शर्मिला गडेकर यांची थिवी पंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निर्वाचन अधिकाऱ्यांना थिवी पंचायतचे सचिव धीरज गोवेकर यांनी सहकार्य केले. निवडीनंतर माजी आमदार किरण कांदोळकर यांनी थिवी पंचायतच्या सभागृहात येऊन सरपंच शर्मिला गडेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या