लाचप्रकरणी शीतल दाभोळकरला दिलासा 

dainik gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशात तिला ७ जुलैपासून सात दिवस दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली आहे.

पणजी

हणजूण येथील लाचप्रकरणातील हणजूण - कायसूवच्या पंचसदस्य संशयित शीतल दाभोळकर हिला आज सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अटक चुकविण्यासाठी गायब असलेल्या शीतल हिला दिलासा मिळाला आहे. 
सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशात तिला ७ जुलैपासून सात दिवस दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिला अटक केल्यास २५ हजार रुपयांची हमी तसेच तत्सम रक्कमेचे दोन हमीदार सादर केल्यावर सुटका करण्यात यावी. अर्जदारने (संशयित) तपासकामात सहकार्य करावे व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. 
हणजूण येथील व्यावसायिकाला त्याच्या कथित बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी हणजूण - कायसूव पंचायतीच्या तिघा पंचसदस्यांनी लाच मागितली होती. त्यासंदर्भातची तक्रार या व्यावसायिकांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. ही लाच घेताना पंचसदस्य हनुमंत गोवेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा रचून अटक केली होती. दुसरा पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर यालाही अटक झाली होती मात्र पंचसदस्य असलेल्या तिसऱ्या संशयित शीतल दाभोळकर हिचा पोलिस शोध घेत होते. तिच्या घराची झडती घेतल्यानंतर तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या सुनावणीवेळी पोलिसांनी पंचनामा करताना ठेवलेल्या त्रुटी तसेच लाच तिने स्वीकारली नसल्याचे मुद्दे ॲड. कार्लोस फरेरा यांनी उपस्थित केले होते. 

 

 

संबंधित बातम्या