शिरोडा कोविड सेंटर कोरोना रुग्णांसाठी जीवनदायिनी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

शासनाच्या आरोग्य खात्यातर्फे रुग्णांना योग्य ती औषधे वेळोवेळी पुरवली जातात. शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच अमित शिरोडकर व इतर पंच सदस्य हे कोविड रुग्णांच्या तब्येतीसंबंधी विचारणा करून काळजी घेतात. - डॉ. अक्षया पावसकर

शिरोडा: कोविड-१९ च्या महामारीवर शिरोड्यातील कोविड केंद्र कोरोनाबाधितांना जीवनदायिनी ठरले आहे.  काराय - शिरोडा येथे जवळजवळ सात वर्षांपूर्वी शासनाने साडेतेरा कोटी रुपये खर्चून बांधलेले अद्ययावत सरकारी आरोग्य केंद्र हे आता फक्त शिरोडा बोरी पंचवाडी आणि शिरोडा मतदारसंघातील नागरिकांसाठी मर्यादित न राहता या आरोग्य केंद्राचे कोविड सेंटर केल्याने या प्रशस्त वास्तूचा वापर आता गोमंतकातील विविध भागातील नागरिकांच्या वापरासाठी होत आहे. ७ जून २०२० रोजी सुरू केलेले हे कोविड सेंटर गेल्या चार महिन्यात रुग्णांना बरे करून पाठवण्याचे व नवसंजीवनी देणारे आशास्थान बनले आहे.

या कोविड सेंटरला ज्या कोविड योद्ध्या डॉक्टरांचे नेतृत्व लाभले ते कोविड केंद्र प्रमुख डॉ. अक्षया पावसकर यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारे आहे. डॉ. पावसकर यांच्याबरोबरच अन्य पाच डॉक्टर रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या बरोबरीने १३ परिचारिका, तसेच सहाय्यक कर्मचारी, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी मिळून एकूण ५० कर्मचाऱ्यांचा ताफा या इस्पितळात कोविड योद्धे म्हणून कार्यरत आहे. 

डॉ. अक्षया पावसकर त्याचे सहकारी डॉक्टर परिचारिका सहाय्यक, सफाई कामगार, सुरक्षा कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता रात्री अपरात्री वाहने कोविड बाधितांना घेऊन येतात. त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देऊन आवश्‍यक सेवा उपलब्ध करून देतात. रुग्णांना गरम पाणी, नित्याची औषधे, काढा देणे, इस्पितळ स्वच्छ ठेवणे, रोज निर्जंतुकीकरण वापरलेल्या साहित्याची योग्य विल्हेवाट लावणे हे काम चोखपणे आणि शिस्तीने केले जाते. 

गेल्या चार महिन्यांच्या काळात जवळजवळ १४१६ कोरोनाबाधित रुग्णांना इस्पितळात आणले गेले. त्यातील योग्य उपचाराने बरे होऊन ११०७ रुग्ण आपल्या घरी गेले. आता फक्त ११९ कोरोनाबाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. कोविडबाधितांना योग्य औषधोपचार, सेंटरची स्वच्छता, प्रत्येक रुग्णाची विचारपूस काळजी योग्यतऱ्हेने घेतली जात असल्याने रुग्ण बरे होऊन घरी परतताना या केंद्राचा सुखद अनुभव घेत घरी जात आहेत.

डॉ. अक्षया पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, सहाय्यक कोणत्याही वेळी येणाऱ्या कोरोनाबाधितांची सुश्रुषा करण्यास तत्पर आणि मग्न असतात. म्हणूनच गेल्या चार महिन्यांत कोविड सेंटर कोरोनाबाधितांना मनात कोणत्याच प्रकारची भीती न बाळगता जीवनात संजीवनी देण्याचे कार्य करणारी जीवनदायिनी बनून राहिले आहे.

डॉ. अक्षया पावसकर यांनी तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, आदी कर्मचारी वर्गाने निरपेक्ष भावनेने कोविड रुग्णाची सेवा चालू ठेवून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या विश्‍वासास पात्र ठरल्याबद्दल आमदार सुभाष शिरोडकर, सरपंच अमित शिरोडकर यांनी डॉक्टरांचा गौरव केला होता. 

आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या डॉक्टरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करणेही गरजेचे आहे.  कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांच्या आणि परिचारिका सफाई कामगार आदींच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व कोविड रुग्णांच्या सेवेबद्दल शिरोडा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अमित शिरोडकर, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, ख्रिस्तोफर डिकॉस्ता, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, मेघशाम शिरोडकर, पल्लवी 

शिरोडकर, सुचिचा वेळीप, ग्राबियाल मास्करेन्हस, डॅन्नी लुईस, मेधा गावकर, शिवानंद नाईक, श्रीकांत नाईक आदी उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या