शिवजयंती मिरवणूक कळंगुटपर्यंत नेणारच; गोव्यातील शिवप्रेमींचा निर्धार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

तिथीनुसार 31 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त होणारी भव्य मिरवणूक कळंगुटपर्यंत नेणारच, असा निर्धार गोवाभरातील शिवप्रेमींनी म्हापसा येथील सभेत केला आहे.

पणजी :  तिथीनुसार 31 मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त होणारी भव्य मिरवणूक कळंगुटपर्यंत नेणारच, असा निर्धार गोवाभरातील शिवप्रेमींनी म्हापसा येथील सभेत केला आहे. या सभेचे निमंत्रक विश्वेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला राज्यभरातील शिवप्रेमींची उपस्थिती होती. अलीकडेच तारखेनुसार, 19 फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने कळंगुट येथे शिवप्रेमीतर्फे आयोजित वाहनांच्या मिरवणुकीला स्थानिक आमदार मायकल लोबो व स्थानिक पंचायतीच्या आक्षेपानुसार उपजिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळे कळंगुट पोलिस ठाण्याचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी वाहनांनी ती मिरवणूक आयोजित करण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे शिवप्रेमींनी तिथे पायी चालत छोटेखानी स्वरूपात मिरवणूक काढली होती.

गोवा वन खात्याचा बेपत्ता वनरक्षक योगेश वेळीप महाराष्ट्रात सापडला

पोलिसांनी ती मिरवणूक अडवल्यामुळे संपूर्ण गोव्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा दावा करून लगेच वाळपई येथील शिवप्रेमी, समाज कार्यकर्ते विश्वेश प्रभू , कामगार नेते अॅड. अजितसिंह राणे तसेच म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ता सुदेश तिवरेकर, अभय सामंत, किशोर राव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे, कळंगुट येथील शिवप्रेमी व इतर शिवप्रेमींनी म्हापसा येथील हुतात्मा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पु्तळ्यासमोर निषेधसभा घेऊन एकंदरीत संतापजनक प्रकरणाचा निषेध व्यक्त केला होता. त्या सभेनंतर खोर्ली म्हापसा येथील श्री देवी सातेरी संस्थानच्या सभागृहात या एकंदरीत विषयावर चर्चा करण्यासाठी दुसरी सभा घेण्यात आली व त्या सभेत या आंदोलनासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आली. त्या सभेत गोव्यातील फोंडा, मडगाव, सांगे, कुडचडे, सावर्डे, वाळपई, कळंगुट इत्यादी भागांतील शिवप्रेमींनी आपापले विचार मांडून स्थानिक आमदार व पंचायतीच्या नकारात्मक धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

आगामी ३१ मार्च रोजी गोव्यातील विविध भागांतून शिवप्रेमींच्या ढोलताशांच्या गजरातील मिरवणुका म्हापसा येथे श्री बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात एकत्रित करून व त्यानंतर हुतात्मा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वंदन करून थेट कळंगुटला मिरवणूक नेण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. कळंगुट येथील श्री देवी शांतादुर्गेस वंदन केल्यानंतर म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिर प्रांगणात मिरवणुकीची सांगता होईल. ही मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढण्याचे या वेळी एकमुखाने ठरवण्यात आले. कळंगुटचे आमदार मायकल लोबो व कळंगुटचे सरपंच दिनेश सीमेपुरुषकर यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला असून त्यांना छत्रपतींच्या संदर्भात असलेल्या अज्ञानाद्दल त्यांचा या सभेत निषेध करण्यात आला.

गोव्यातील 37 आरोग्य केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम; पणजीत 100 ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण

शिवाजी महाराजांचे चरित्र, चारित्र्य, त्यांचे उत्कृष्ट प्रशासन, धर्म-संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य, त्यांनी पुरस्कृत केलेला सर्वधर्मसमभाव ही तत्वे तसेच त्यांनी गोव्याच्या मुक्तिलढ्यासाठी दिलेले योगदान जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आगामी शिवजयंतीदिनी कळंगुटमध्ये मिरवणूक नेणे आवश्यकच आहे, असे मत ॲड. अजितसिंह राणे यांनी सभेत बोलताना व्यक्त केले. आमदार मायकल लोबो यांना जाब विचारणार शिवजयंतीनिमित्त कळंगुट येथे आयोजित मिरवणुकीस कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्याचे पत्र पाठवल्याप्रकरणी यासंदर्भात नेमके काय कारण होते, यासंदर्भात आमदार मायकल लोबो यांना जाब विचारण्याचा निर्णय या सभेत शिवप्रेमींनी घेतला. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार लोबो यांनी आगामी मिरवणुकीसंदर्भात स्वत:ची ठोस भूमिका जाहीर करावी यासाठी शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घ्यावी, असेही या सभेत ठरले.

आपला हात नाही : मायकल लोबो 

कळंगुट येथे शिवजयंतीदिनी मिरवणूक अडवण्याचा आदेश देण्यामागे आपला हात नाही, असे ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांनी काल येथे स्पष्ट केले. ते काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जाताना त्यांना कळंगुटच्या या प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले, जिल्हाधिकारी व पोलिस यांच्या संवादात त्रुटी राहिल्याने हा प्रकार घडला आहे. मी अशा समारंभात सहभागी होतो, त्यामुळे मी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. आयोजकांकडून पंचायतीला दिलेले पत्र व मिरवणूक या दोन्ही भिन्न बाबी आहेत. याउलट मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसही सरकारने तैनात केले होते. मी असले काही वाईट करत नाही.

संबंधित बातम्या