
डिचोली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीची वक्तव्ये करून युवा पिढीचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करू नये. छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना अगोदर त्यांच्याबद्दलचा पूर्ण इतिहास जाणून घ्यावा, असा सल्ला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुबोध मोने यांनी डिचोलीतील शिवप्रेमींच्या सभेत दिला आहे.
शिवाजी महाराज यांचे गोव्यासाठी काहीच कार्य नसल्याचे वक्तव्य साहित्यिक ॲड. उदय भेंब्रे यांनी समाजमाध्यमातून केल्याचा दावा करीत, या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे डिचोलीतील जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. भेंब्रे यांचा दावा चुकीचा असल्याचे मोने म्हणाले.
यावेळी शांतीसागर हेवाळे, उदय जांभेकर, मंदार गावडे, शेखर नाईक, गोविंद साखळकर, विजय होबळे, शैलेश जाधव आदी शिवप्रेमी उपस्थित होते. उपस्थित शिवप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.
शिवरायांचे गोव्यावर राज्य नव्हतेच : भेंब्रे
शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र त्यांनी किंवा संभाजींनी गोव्यावर राज्य केले या दाव्यात कुठलेही तथ्य नाही किंवा त्याला कसलाही ऐतिहासिक पुरावा नाही. गोव्यातील आठ तालुक्यांवर शिवाजी महाराजांची सत्ता होती असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले होते. हे वक्तव्य इतिहासाला धरून नाही एवढेच मी माझ्या कार्यक्रमात म्हटले होते, असे ॲड. उदय भेंब्रे म्हणाले. गोव्यात ज्यावेळी बाटाबाटी सुरू होती त्यावेळी महाराष्ट्रात शिवरायांचे राज्य होते. तरीही त्यांनी गोव्यात येऊन पोर्तुगगिजांना बाहेर घालवून देण्यासाठी आक्रमण केले नाही. उलट सिद्दीशी लढण्यासाठी आरमार बांधण्याकरिता पोर्तुगीज कारागिरांची मदत घेतली. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही तर पांडुरंग पिसुर्लेकर यांनी आपल्या ‘मराठे पोर्तुगीज संबंध'' या पुस्तकात दाखल्यासह लिहिले आहे, असे भेंब्रे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.