
बार्देशात एकाच दिवशी व एकाच वेळी दोन ठिकाणी शिगमोत्सव मिरवणूक स्पर्धा भरवल्याने स्पर्धकांनी पहिली पसंती पर्वरी मतदारसंघास दिली. विशेष म्हणजे, पर्वरीत पहिल्यांदाच यंदा शिगमोत्सव आयोजित केला आहे. परिणामी म्हापशातील शिगमोत्सवास थंडा प्रतिसाद लाभला.
दरम्यान, पर्वरीमधील शिगमोत्सव मिरवणुकीत भाग घेतल्यानंतर स्पर्धक रात्री उशिरा म्हापशाच्या दिशेने येताना दिसले.प्रेक्षकांनीही पर्वरीकडेच जाणे पसंत केले.
रविवारी (ता.12) सायंकाळी सहा वाजता म्हापशातील शिगमोत्सवास मान्यवरांच्या उपस्थितीत बावटा दाखविण्यात आला, मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत फक्त दोन रोमटामेळ दाखल झाले होते. तर तिसऱ्या रोमटामेळाने नुकताच ताल धरण्यास सुरवात केली होती. तर तीन चित्ररथ येऊन गेले.
एरवी आधी वेशभूषा, लोकनृत्य, मेळ व शेवटी चित्ररथ अशा क्रमाने मिरवणूक चालायची. परंतु यंदा स्पर्धकांचा अल्पप्रतिसाद लाभल्याने उपस्थित स्पर्धकांना समितीकडून मिरवणुकीत पुढे पाठविले जात होते. त्यामुळे शिगमोत्सवातील शिस्त व चमक हरवलेली दिसली.
रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रेक्षकांच्या नजरा या मिरवणुकीच्या रस्त्याकडे खिळल्या होत्या, मात्र स्पर्धकच नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला. रात्री १० वाजेपर्यंत रोमटामेळ, लोकनृत्य, चित्ररथांची संख्या खूपच कमी असल्याने बराचवेळ रस्त्यावर अंतर पडले होते.
त्यामुळे लोकांना ताटकळत राहावे लागले. तर काहींनी घरची वाट तर काहींनी गाडी सुरू करुन पर्वरीला जाण्यात धन्यता मानली. एकूणच म्हापशातील शिगमोत्सव ‘फ्लॉप शो’ ठरल्याचे लोक कार्यक्रमस्थळी आपापसात बोलताना दिसले.
16 चित्ररथ, 9 रोमटामेळ पथके दाखल
रात्री दहानंतर स्पर्धक पर्वरीतील शिगमोत्सव स्पर्धा संपवून म्हापशाच्या दिशेने येऊ लागले. त्यामुळे म्हापसा शिगमोत्सव समितीकडे रात्री उशिरापर्यंत १६ चित्ररथ, ९ रोमटामेळ, चार लोकनृत्य तसेच इतर वेशभूषा स्पर्धकांनी नोंदणी केल्याचे माहिती मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.