वाढत्या कोरोनारुग्ण संख्येमुळे फोंड्यातील कोविड इस्पितळ ' फुल्ल'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

मडगावचे कोविड इस्पितळ रुग्णांनी भरत चालल्याने आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळ कोविड इस्पितळ करण्यात आले होते.

फोंडा: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने इस्पितळे भरत असून नव्याने रुग्णांना दाखल करायचे कुठे, असा सवाला आता उपस्थित होत आहे. मडगावचे इएसआय इस्पितळ त्यानंतर बांबोळी इस्पितळातील निर्धारित वॉर्ड आणि आता फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळ कोरोना रुग्णांनी "फुल्ल'' झाल्याने नवीन रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी आता आरोग्य खात्याला नव्याने जागेसाठी शोधाशोध करावी लागणार आहे. 

मडगावचे कोविड इस्पितळ रुग्णांनी भरत चालल्याने आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळ कोविड इस्पितळ करण्यात आले होते. या कोविड इस्पितळात कोरोना रुग्णांसाठी शंभर खाटांची सोय करण्यात आली आहे. विशेषतः गरोदर व प्रसुती झालेल्या कोविड महिला रुग्णांना या ठिकाणी ठेवण्याचे निर्धारित करण्यात आले होते. गरोदर व बाळंत महिलांबरोबरच अन्य कोविड पुरुष व महिला रुग्णांनाही या इस्पितळात दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. गरोदर महिलांबरोबरच बाळंत झालेल्या महिलांच्या नवजात अर्भकांसाठीही ठेवण्याची सोय यावेळी वॉर्डात करण्यात आल्याने जागा पूर्णपणे या सुविधेने व्यापली होती. सुरवातीला वीस व आता हळूहळू फोंड्यातील हे कोविड इस्पितळ फुल्ल झाले असून कोरोनासोबतच अन्य आजार असलेले चाळीस रुग्ण या इस्पितळात भरती करण्यात आले आहेत. त्यात २६ पुरुष व १४ महिला रुग्णांचा समावेश आहे. 

गरोदर व बाळंत महिलांसाठीच्या चाळीसही खाटा फुल्ल झाल्या आहेत. याशिवाय तेरा अर्भकांनाही या ठिकाणी ठेवण्यात आल्याने वॉर्ड फुल्ल झाला आहे. 

चतुर्थीनंतर वाढले कोरोना रुग्ण!
चतुर्थीच्या वेळी बहुतांश लोकांनी कोविडसंबंधीचे सर्व नियम खुंटीला टांगून ठेवल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दीड दिवसांबरोबरच काही ठिकाणी पाच ते सात दिवसांचा गणपतीही ठेवण्यात आला. आरत्या, भजनाचे प्रकारही झाले, त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याला फाटा देण्यात आला, त्यामुळेच आता राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या