वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवा, अन्‍यथा सशुल्‍क चाचणी

CM
CM

पणजी

गोव्‍यात येणाऱ्यांना आता १४ दिवस अलगीकरणात राहावे लागणार नाही. गोव्यात येणाऱ्या व्यक्तीने ‘कोविड’ची लागण झालेली नाही, असे वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे किंवा गोव्यात आल्यावर शुल्क भरून चाचणी करून घ्यावी, या दोन पर्यायांचा वापर करता येणार नाही. ‘चाचणी नको, त्यामुळे अलगीकरणात राहतो’ हा पर्याय आता वापरता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे मंत्रालयात दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते म्हणाले, आता कोविडच्या एक हजार चाचण्या केल्या, तरी अहवाल दुसऱ्या दिवशीपर्यंत मिळतो. त्यामुळे गोव्यात येणाऱ्यांसाठीच्या नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यात येणाऱ्यांना नियम लागू करण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. आजवर गोव्यात येणाऱ्यांनी कोविडची लागण नसल्‍याचे प्रमाणपत्र आणणे किंवा कोविड चाचणी करून घेणे किंवा अलगीकरणात १४ दिवस राहणे, अशा तीन पर्यायांचा विचार करावा असा नियम होता. त्यात आता बदल केला आहे.
ते म्हणाले, माशेल येथील बसस्थानक गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडून कदंब वाहतूक महामंडळाला हस्तांतरीत करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कदंबच्या कर्मचाऱ्यांनी कोविड टाळेबंदीच्या काळात उत्तम काम केले आहे. त्यांना त्याबद्दल त्यांचे महामंडळाने ठरवलेल्या योजनेनुसार कौतुक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. शिधापत्रिका नसलेल्यांना प्रत्येक कुटुंबाला पाच किलो तांदूळ वितरीत करण्याचे ठरवले आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अशा कुटुंबांची नोंद केली जाणार आहे. स्थलांतरीत मजुरांसाठी ही योजना प्रामुख्याने आहे.
कोविड संदर्भात जनतेची कोणती काळजी घ्यावी, याची चर्चा मंत्रिमंडळात झाली. अनेक विमाने व रेल्वे रद्द झाल्याने अनेकजण राज्यात आलेले नाही. विदेशात अजूनही मोठ्या संख्येने गोमंतकीय अडकलेले आहेत. त्यांना गोव्यात परतणे सुलभ व्हावे, यासाठी नागरी हवाई वाहतूकमंत्री, विदेश व्यवहारमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना पत्रेही पाठवली आहेत. विदेशातून थेटपणे गोव्यात विमाने पाठवा, अशी विनंती केली आहे, असे ते म्हणाले.
येत्या ३१ मे नंतर टाळेबंदी कायम राहणार नाही याविषयी स्पष्टता नाही. गोवा अद्याप हरित विभागात आहे. प्रवास केलेल्यांनाच कोविड लागण झालेली आहे. कोविड चाचणी केल्यानंतर त्या व्यक्तीने स्वयं अलगीकरणात राहणे आवश्‍यक आहे. त्याला चाचणीचा निकाल मोबाईल एसएमएसद्वारे कळवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वस्‍तू व सेवा कर
अधिसूचनेस मंजुरी

वस्तू व सेवा कर अधिसूचना काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. केंद्र सरकारने त्याविषयीचा निर्णय याआधीच घेतला होता. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी केलेल्या खर्चाला कार्योत्तर मंजुरीही देण्यात आली. गोमेकॉत दोन डॉक्टर कंत्राटी पद्धतीने नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मये येथील तंत्रनिकेतनात गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत, त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. गोवा औषधशास्र महाविद्यालयात शिपाई नेमण्यासही मंत्रिमंडळाने आज मान्यता देण्यात आली. कोविड प्रयोगशाळेत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमण्यास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. दोन कार्यकारी अभियंत्यांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्तीला कार्योत्तर मंजुरीही मंत्रिमंडळाने आज दिली. कोविड उपचारासाठी गोमेकॉत काही साहित्य खरेदीसाठी कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com