श्रीपाद नाईक हेच खरे बहुजनांचे नेते

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

श्रीपाद नाईक हेच गोव्यातील बहुजन समाजाचे खरेखुरे नेते आहेत, असे ठाम वक्तव्य करून मनोहर पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांच्याच नावाचा विचार झाला होता; तथापि, भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा दावा गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केला आहे. अस्नोडा येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

म्हापसा : श्रीपाद नाईक हेच गोव्यातील बहुजन समाजाचे खरेखुरे नेते आहेत, असे ठाम वक्तव्य करून मनोहर पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांच्याच नावाचा विचार झाला होता; तथापि, भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा दावा गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केला आहे. अस्नोडा येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यासंदर्भात श्री. सरदेसाई पुढे म्हणाले, की राज्यात मु्ख्यमंत्रिपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव नव्हतेच. पर्रीकर यांच्यानंतर केवळ श्रीपाद नाईक यांचेच नाव भाजप गोटात चर्चेत होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या पदासाठी श्रीपाद नाईक यांना पाठिंबा देण्याची विनंती मला केली होती. त्यावेळी मी त्यांना लोकसभेसाठी यापुढे कोण उमेदवार असतील असे विचारले होते. त्यावेळी शहा यांनी लोसभेसाठीही श्रीपाद नाईक हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट केले होते.

श्रीपादभाऊंनाच मु्ख्यमंत्री करा व लोकसभेसाठी नवीन उमेदवार शोधा अशी सूचना मी केली होती. तथापि गोव्यातील भाजपाच्या काही नेत्यांनी दिल्लीपर्यंत जाऊन आपण सारे श्रीपाद नाईक यांच्या विरोधात आहे, असे सांगितले व त्यामुळे श्रीपाद नाईक मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, असेही श्री. सरदेसाई म्हणाले.

आपण श्रीपाद नाईक यांच्या विरोधात कधीच नव्हतो. कारण, पर्रीकर यांच्यानंतर बहुजन समाजाचे ते खरे नेते आहेत याचा प्रत्यय मला आला होता, असे नमूद करून श्री. सरदेसाई म्हणाले, त्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदी विश्वजित राणे यांचे नाव सुचवले; पण, राणे यांनी ऐनवेळी यू-टर्न घेतला. श्रीपादभाऊंच्या विरोधात कटकारस्थान करण्यात भाजपा सरकारमधील विद्यमान मंत्री आहेत, असा गौप्यस्फोटही सरदेसाई यांनी केला.

गोवा फॉरवर्ड पक्ष सध्याच्या विधानसभेत आमदारांची संख्या वाढवून सरकार करण्याचा प्रयत्न करणार नाही. सर्वोच्च न्यालयाचा निर्णय भाजपाच्या विरोधात झाला तरीसुद्धा आम्ही सरकार घडवण्याचा प्रयत्न करणार नाही. आमचे लक्ष्य येती विधानसभा निवडणूक आहे. आम्हाला आगामी एका वर्षाच्या काळात सरकारात सामील व्हायचेच नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही गोव्यात दुसरी मुक्ती चळवळ सुरू करणार आहोत. भाजपा व काँग्रेसमधील काही आमदार जे माझे वैयक्‍तिक मित्र आहेत त्यांनाही आता ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ या मुद्द्याचे महत्त्व पटू लागले आहे. ती मंडळी आमच्या पक्षाच्या पाठीमागे भरभक्कमपणे राहणार आहे, असा दावाही सरदेसाई यांनी केला. केंद्राचे सहकार्य न घेता आम्ही प्रादेशिक पक्ष गोव्याला प्रगतिपथावर नेऊ शकतो व त्या दृष्टीने आम्ही विकासासंदर्भातील आदर्श मूलतत्त्वे आखणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्रीकर यांच्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विविध घोटाळे करून गोवा विकून टाकल्याचा दावाही श्री. सरदेसाई यांनी केला.

संबंधित बातम्या