गोव्‍याची ‘श्‍वेतकपिला’ गाय अशी नवी ओळख; वाळपई गोशाळेत संवर्धनासाठी संधी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

श्‍वेतकपिला देशी गाय पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे. गोव्यात उत्तर गोवा व दक्षिण गोव्यात अशा दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी ती आढळून येते. वाळपई नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात ही श्‍वेतकपिला गाय स्थान करून आहे.

वाळपई: भारतात देशी गोवंशाला फार अनन्यसाधारण महत्त्‍व आहे. वेदांमध्ये देशी गायींचे अपार विशेष महत्त्‍व आहे. भारतात काही राज्यात देशी विविध नावाने परिचित असून त्या त्या राज्यांची अशी वेगळी ओळख आहे. उदाहरण सांगायचे झाल्यास वेचुर ही गाय केरळ राज्यात, राठी ही गाय राजस्थान, डांगी व देवणी ही गाय महाराष्ट्र, कांकरेंज व गीर ही गाय गुजरात राज्याची अशी ओळख बनली आहे. अशा अन्य राज्यांप्रमाणे गोवा राज्यातही श्‍वेतकपिला गाय या नावाने वेगळी ओळख बनली आहे. 

श्‍वेतकपिला देशी गाय पूर्णपणे पांढऱ्या रंगाची आहे. गोव्यात उत्तर गोवा व दक्षिण गोव्यात अशा दोन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणी ती आढळून येते. वाळपई नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रात ही श्‍वेतकपिला गाय स्थान करून आहे. या गायीचे शिंग, पाय, डोळ्यांच्या भुवया, शेपटीचा तुरा असे सर्व अंग हे पांढरे आहेत. ही श्‍वेतकपिला देशी गाय प्रथम वर्गातील उच्च स्थानातील आहे. तिची पवित्रता, निर्मलता परिपूर्ण अशी आहे. त्यामुळे माणसाच्या आरोग्य जीवनात या गायीला महत्त्‍व आहे. सेंट्रल कोस्टल अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्‍टिट्यूट जुने गोवे येथे तिची तशी नोंद आहे. सुंदर देखणी अशी श्‍वेतकपिला गाय वाळपई नाणूस गोशाळेचे वैशिष्‍ट्य बनले आहे. 

श्‍वेतकपिला गाईत दररोज तिच्यात साडेतीन लिटर दूध देण्याची क्षमता आहे. सध्‍या देशात जर्सी गायीचे वावगं उठलेले आहे. भरपूर दूध मिळविण्यासाठी मानव जर्सी गायीच्या आहारी जात आहे. माणसाला जर चांगले निरोगी जीवन जगायचे असेल, तर देशी गायीला पसंती देण्याची गरज आहे. श्‍वेतकपिला ही देशी गायीपासून चांगली पिढी तयार करण्याची संधी आहे. गोव्यात पांढरी म्हणजेच श्‍वेतकपिला गाय वेगळेपण सांगणारी ठरली आहे. - डॉ. रघुनाथ धुरी, गोशाळेचे पशुवैद्यकीय सेवक

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या