खनिजवाहू ट्रक अपघातातून सिद्धेश भिसे थोडक्यात बचावले

खनिजवाहू ट्रक अपघातातून सिद्धेश भिसे थोडक्यात बचावले
sange traffic

कुडचडे

खनिज वाहतुकीची डोकेदुखी दिवसेंदिवस सामान्य नागरिकांना त्रासदायक बनू लागली असून जसा पावसाळा जवळ येऊ लागला आहे, तशी खनिज वाहतुकीची गती अधिक तेज होऊ लागल्याने अपघात होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. आज संध्याकाळी कुडचडेचे समाज कार्यकर्ते सिद्धेश भिसे केवळ नशीब बलवत्तर म्हणून खनिज वाहू ट्रकच्या अपघातातून बचावले. वाहतूक पोलिसांनी व सरकारने कुडचडेत होणाऱ्या खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर उपस्थित नागरिक संतापले व रस्त्यावर आल्याने काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली. नंतर पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडून वाहतूक सुरळीत केली.
संध्याकाळी पाच वाजले तरी खनिज वाहतूक करणारे ट्रक एकमेकांना माघे टाकण्याची शर्यत करू लागल्याने बाजारात फिरणाऱ्या सामान्यांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. एक गाडी थांबल्यास मागची गाडी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. असाच प्रयत्न कुडचडेतील पंटेमळ जंक्शनवर आपण रस्ता ओलांडण्यासाठी थांबलो असता घडला. यावेळी भरधाव येणारा ट्रक मला ठोकर मारणार होता. परंतु प्रसंगावधान राखून मी त्वरित बाजूला झाल्याने वाचलो, असे भिसे यांनी सांगितले.
कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी असे अपघात टाळण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांना सूचना केलेल्या आहेत. परंतु सध्या हेल्मेट न घालणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांना शोधून त्यांन दंड देण्यातच पोलिस व्यस्त आहेत. रस्त्यावरील जंक्शनवर व रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी पोलिस तैनात करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com