गणेशभक्‍तांचे श्रध्दास्थान डिचोलीतील सिध्दीविनायक

प्रतिनिधी
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

नाईकनगर-बोर्डे येथील श्री श्री सिध्दीविनायक म्हणजे डिचोलीवासीयांबरोबरच तमाम गणेशभक्‍तांचे श्रध्दास्थान बनले आहे.

डिचोली: नाईकनगर-बोर्डे येथील श्री श्री सिध्दीविनायक म्हणजे डिचोलीवासीयांबरोबरच तमाम गणेशभक्‍तांचे श्रध्दास्थान बनले आहे. विघ्नहर्त्या गणरायावर श्रध्दा असलेल्या भक्‍तगणांच्या सहकार्याने पै, पै जमा करून २९ वर्षांपूर्वी उभे राहिलेले श्री श्री सिध्दीविनायकाचे मंदिर शहराच्या वैभवात भर घालीत असून मंगलमूर्ती बाप्पावर श्रध्दा असलेले भाविक श्री सिध्दीविनायकाच्या चरणी मनोभावे आपली सेवा अर्पण करतात. विनाईकनगर वसाहतीत राहणाऱ्या भक्‍तगणांच्या पुढाकारातून उभे राहिलेले हे मंदिर हळूहळू बरेच प्रसिध्द होऊ लागले आहे. 

हिंदू संस्कृतीत गणपतीला प्रथम स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरवात गणेश पुजनानेच होते. गणपतीचे हे महात्म्य लक्षात घेवून १९८५ साली नाईकनगरमध्ये श्री सिध्दीविनायकाचे मंदिर असावे अशी कल्पना समोर आली आणि ७ एप्रिल १९८५ रोजी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर नाईकनगरमधील रहिवाशांची एक सर्वसाधारण सभा होऊन नाईकनगर विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळ स्थापन करण्यात आल्यानंतरच सिध्दीविनायक मंदिराच्या कल्पनेला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. सुरवातीस नाईकनगरमधील प्रत्येक घरातून प्रति महिना ५ रु. देणगी गोळा करण्यात येऊ लागली. नंतर श्री सिध्दीविनायकाचे छोटेशे मंदिर उभारण्यात आले आणि १९ जानेवारी १९९१ या दिवशी मंदिराची विधिवत स्थापना करण्यात आली. नंतर मंदिरासमोर तुळशीवृंदावन उभारण्यात आले. ३१ जानेवारी १९९८ या दिवशी धार्मिक विधीसह या तुळशीवृंदावनाचे उद्यापन करण्यात आले. २००८ साली मंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्यातून मंदिरासाठी भव्य मंडप बांधण्यात आला, तर २८ जानेवारी २००९ या दिवशी मंदिरावर शिखर कलश स्थापना करण्यात आली.  

मंदिरातील उत्सव
या मंदिरात मंगळवार, संकष्टी, विनायकी हे उत्सव नियमितपणे साजरे करण्यात येतात. दरवर्षी देवस्थानात गणेश जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा करण्यात येत आहे. याशिवाय दर मंगळवारी मंदिरात नियमित भजन करण्यात येते. एका मंगळवारी ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांतर्फे तर दुसऱ्या मंगळवारी श्री सिध्दीविनायक महिला भजनी मंडळातर्फे भजन करण्यात येते. याशिवाय या मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचीही रेलचेल चालू असते. यंदा मात्र कोविड महामारीमुळे देवस्थानातील धार्मिक विधी आणि उत्सवांवर निर्बंध आले आहेत. मार्च महिन्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून गर्दी टाळण्यासाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तरीदेखील गणेशभक्‍त मनोभावे आराध्य दैवताचे स्मरण करतात. 

संबंधित बातम्या