डिचोलीतील बगलमार्ग होणार लवकरच ‘नो पार्किंग’ क्षेत्र

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

शहरातील कदंब बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कलपर्यंतच्या बगलमार्गावरील बेशिस्त आणि धोकादायक पार्किंगवर आता प्रतिबंध येणार आहे. एका बाजूने वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने सौंदर्यीकरण काम चालू असलेला हा बगलमार्ग आता ‘नो पार्किंग’ क्षेत्र जाहीर करण्यासंबंधीचे सोपस्कार सुरू आहेत.

 डिचोली: शहरातील कदंब बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कलपर्यंतच्या बगलमार्गावरील बेशिस्त आणि धोकादायक पार्किंगवर आता प्रतिबंध येणार आहे. एका बाजूने वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने सौंदर्यीकरण काम चालू असलेला हा बगलमार्ग आता ‘नो पार्किंग’ क्षेत्र जाहीर करण्यासंबंधीचे सोपस्कार सुरू आहेत. पुढील आठवड्यापर्यंत तत्संबंधीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्‍यता आहे. पार्किंग क्षेत्र बनलेल्या या बगलमार्गाच्या दुतर्फा क्रेन, बसगाड्या, ट्रक आदी वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात येतात. सुरवातीपासूनच हा प्रकार सर्रासपणे चालू आहे. 

या बेशिस्त पार्किंगमुळे हा बगलमार्ग वाहतुकीस असुरक्षित बनला आहे. आतापर्यंत लहान-सहान अपघातही घडलेले आहेत. या बगलमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळील वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी या जंक्‍शनवर वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील आठवड्यात या सिग्नल यंत्रणेचे उद्‌घाटनही करण्यात आले आहे.

मात्र, बगलमार्गावरील बेशिस्त पार्किंगचा प्रकार हा या बगलमार्गावरील सुरळीत वाहतुकीतील मोठा अडथळा ठरून सिग्नल यंत्रणाही कुचकामी ठरण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या बगलमार्गावरील बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणल्यावाचून पर्याय नाही. हा बगलमार्ग ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून अधिसूचित करावा असा प्रस्ताव डिचोली पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. अत्यावश्‍यकता ओळखून हा बगलमार्ग ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या हालचालीही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. एकदा काय हा बगलमार्ग ‘नो पार्किंग’ क्षेत्र म्हणून अधिसूचित झाला, की या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या