बुडालेल्या कुर्डी गावात कबर दिसल्याने चर्चेला उधाण

The sight of a tomb in the submerged Kurdi village sparked a discussion
The sight of a tomb in the submerged Kurdi village sparked a discussion

सांगे : साळावली धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या कुर्डी गावातील (Kurdi village) नागरिक उन्हाळ्यात धरणाच्या (Dam) पाण्याची पातळी खाली गेल्यावर गतजीवनाच्या स्मृती पाहण्यासाठी तेथे जातात. काही हिंदू व ख्रिस्ती श्रद्धाळू जुन्या प्रार्थना स्थळांनाही भेट देतात. या गावात मुस्लिम समाजाचेही लोक रहायचे, पण त्यांचे कोणतेच प्रार्थना स्थळ नव्हते. मात्र, आता तेथे काहींनी नव्याने बांधकाम करत तेथे कबर (Kabara) असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला असून समाज माध्यमांवर या कृतीमुळे चर्चेची वावटळ उठली आहे.(The sight of a tomb in the submerged Kurdi village sparked a discussion)

तेथील मूळ रहिवासी असलेले सर्वच धर्मीय वर्षातून एकदा जाऊन कुर्डीतील जुन्या स्मृती जागविण्यासाठी सार्वजनिक प्रयत्न करतात. हिंदू आपल्या पद्धतीने श्री सोमेश्वर देवाची वार्षिक पूजा करतात. ख्रिश्चन धर्मीय आपल्या देवाची कुर्डीत जाऊन पूजा करीत असतात, पण मुस्लिम धर्मीय कुर्डीत काही धार्मिक कृत्ये करीत असा अनुभव नाही. आंगडी - कुर्डी येथे मुस्लिम बांधवांची काही घरे होती, पण मशिद, दर्गा नव्हता. दफन केलेल्या कबरी होत्या. आता त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील काहीजण तिथे जाऊन कबरीवर चादर चढवून इतर धर्मियांप्रमाणे आपला वार्षिक उत्सव साजरा करू लागले आहेत. यंदा प्रथमच आणि नव्याने काही केले असे नसून पूर्वीपासूनच आंगडी -  कुर्डी येथे रहात असलेल्या लोकांच्या पूर्वाजांच्या कबरी पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर गेल्या काही दिवसात संशयकल्लोळ माजला आहे. 

यंदा मुस्लिम धर्मियांनी आंगडीत लक्ष वेधून घेण्यासारखा प्रकार केल्याने सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. कबर जुनीच आहे. आजूबाजूला अनेक लहान मोठ्या कबरी आहेत, पण चादर चढविलेली कबर कोणाची ती गावातील लोकांना कोणालाच माहिती नाही, पण यंदा त्या कबरीच्या ठिकाणी ‘हजरत सय्यद सलाउद्दीन शहा काद्री’ असा नामफलक लावण्यात आला आहे. सोबतीला कबरी सभोवताली दगडी चौथरा रचला आहे. नव्याने सिमेंट बांधकाम केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमुळे कुर्डीतील या स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी मामलेदार मनोज कोरगावकर, पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर, गटविकास अधिकारी भगवंत करमली, तलाठी दामू नाईक उपस्थित होते.

आंगडी - कुर्डी गावात पूर्वीपासून मुस्लिम समाजाची अवघीच घरे होती, पण धार्मिक उत्सव साजरा करण्याकरीता तेथे दर्गा, मस्जिद असा प्रकार नव्हता. केवळ मृत्यू झालेल्यांच्या कबरी होत्या, पण जलसंपदा खात्याच्या दुर्लक्षपणामुळे हल्ली कुर्डी गावात नको ते प्रकार घडू लागले आहेत. अजूनही कुर्डी गावात काही घरांचे अवशेष, तुळशी वृंदावन, मंदिरांचे गर्भगृह, देवतांच्या मूर्ती, लिंग, क्रॉस दिमाखात उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. याच जुन्या आठवणी कुर्डीवासीय आपल्या आजच्या पिढीला दाखवायला जात असतात.
- मनोज पर्येकर, पंच, भाटी ग्रामपंचायत

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कुर्डीतील प्रकाराबद्दल पाहणी केली असता आंगडी येथे नव्याने बांधकाम करण्याचा प्रकार होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आंगडी गावात मुस्लिम लोक रहात होते. त्यांच्या कबरी आजही दिसून येतात. याचा अर्थ नव्याने कोणतेही बांधकाम करण्याचा परवाना कोणालाही दिलेला नाहीं. कुर्डी गावची सुरक्षा करण्याची जबाबदारी जलसंपदा खात्याची असून सर्व वाटा बंद करून गेट घालून सुरक्षा रक्षक तैनात करण्याची सूचना जलसंपदा खात्याला केली आहे.
- सागर गावडे,  उपजिल्हाधिकारी, सांगे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com