पोलिसांच्या शिट्ट्याच ठेवतात नियंत्रण

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

सांस्कृतिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या फोंड्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. फोंडा शहराला तर सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या शहरात वाहतुकीचा कायम राबता असतो.

फोंडा: सांस्कृतिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या फोंड्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. फोंडा शहराला तर सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या शहरात वाहतुकीचा कायम राबता असतो. नित्य कामधंद्यानिमित्त फोंड्यात येणाऱ्या स्थानिकांबरोबरच पर्यटनासाठीसाठी येणाऱ्या पर्यटक वाहनांची मोठी गर्दी फोंडा शहराच्या रस्त्यांवर होते. त्यामुळे बऱ्याचदा फोंड्यातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस आपल्यापरीने प्रयत्न करीत असले तरी वाहनचालकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे राज्यातील अन्य काही शहरात वाहतूक यंत्रणा हाताळण्यासाठी सिग्नल्स बसवण्यात आले आहेत, मात्र फोंड्यात  अजून ही सिग्नल यंत्रणा आलेली नाही. फक्त पोलिसांच्या शिट्ट्या आणि हातवारे यावरच सध्या तरी फोंड्यातील वाहतूक यंत्रणा चालत आहे.

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून फोंड्याला पाहिले जाते. देवदेवतांचे वास्तव्य आणि निसर्ग पर्यटन स्थळे यामुळे राज्यातील पर्यटनासाठीही फोंड्याचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. फोंड्यातील देखणेपण हे येथील सुबक सुंदर देवालयांमुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळे दैनंदिन वाहतुकीबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचाही मोठा राबता फोंडा शहरात असतो. फोंडा शहराकडूनच या तालुक्यातील विविध मंदिरे त्याचबरोबर धारबांदोडा तालुक्याला जायचे झाले तर फोंड्याहून जावे लागते. तसे पाहिले तर फोंडा शहर हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. 

फोंडा शहराच्या बाहेरून बगल रस्ते उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पणजी अथवा मडगावहून कुळेतील दूधसागरला जायचे झाले तर फोंड्याहूनच जावे लागते. बऱ्याचदा पर्यटक शहरातून जायचा आग्रह धरतात, त्यामुळे वाहनांची गर्दी शहरातील रस्त्यावर होते. या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी समस्या फोंड्याला कायम सतावते. 

शाळा, विद्यालयांच्या विद्यार्थ्यांमुळे तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वाहतूक व्यवस्था सावरताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात. विशेषतः फोंडा बसस्थानकाशेजारी असलेल्या गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी भर शहरातील रस्ते अडवून ठेवावे लागतात. 

सकाळी शाळा भरतेवेळी तसेच दुपारी व संध्याकाळी विद्यार्थी सुटल्यावर वाहनांची गर्दी रोखून आधी विद्यार्थ्यांना रस्ता पार करावा लागतो. त्यासाठी फोंड्यातील वाहतूक पोलिस तैनात करावे लागतात. वाहतूक पोलिसच रस्त्यावरील वाहतूक यंत्रणा हाताळत असल्याने फोंड्यात कायम शिट्ट्यांचा आवाज ऐकू येतो. 

तसे पाहिले तर फोंडा शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेची आवश्‍यकता असली तरी त्यात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या तरी पोलिसांच्या हातवाऱ्यावरच वाहनचालकांना निर्भर रहावे लागत आहे.

बगल मार्गावर सिग्नल यंत्रणा!
फोंड्यातील चौपदरी रस्त्यावर कुर्टी ते शापूर - फोंडापर्यंतच्या उड्डाण पुलाच्या रस्त्यावर शापूर व कदंब बसस्थानकावर जाणाऱ्या रस्त्यावर जुन्या वाहतूक कार्यालयासमोरील रस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. हा चौपदरी रस्ता असल्याने कुर्टीहून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे या ठिकाणी रस्ता पार करणे धोक्याचे ठरले आहे. त्यातच या भागात ‘अंडरपास़़'' नसल्याने गैरसोयीत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे रस्ता पार करायचा झाल्यास धोकादायक ठरू शकते. शापूर व लगत राहणाऱ्या लोकांनी मागच्या काळात या ठिकाणी रस्ता पार करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करीत आंदोलनही छेडले होते, मात्र जवळच साफा मशीद हे वारसास्थळ असल्याने या मशिदीजवळ अंडरपास उभारण्यास केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली त्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची शिफारस करण्यात आली आहे, मात्र अजून ती कार्यवाहीत आणलेली नाही. 

फोंडा शहरातील गर्दीची ठिकाणे!
फोंडा शहरात आल्मेदा हायस्कूल ते फोंडा जुने बसस्थानक तसेच वरचा बाजार व तिस्क - फोंडा या भागात कायम वाहतूक कोंडीची समस्या असते. त्यामुळे मुख्य म्हणजे मुख्य शहराच्या अंतर्गतच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना गरजेची आहे. आल्मेदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमुळे रस्ता पार करताना वाहनांना थांबवावे लागत असल्याने वाहतूक कोंडी होते, त्यामुळे दहा वर्षांपूर्वी या हायस्कूलसमोरील मुख्य रस्त्यावर भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे, मात्र त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. याशिवाय विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असल्याने या ठिकाणची वाहतूक व्यवस्था हाताळताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात.
 

संबंधित बातम्या