सर्वपित्री अमावस्येला पितरांना संतुष्ट करा

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

पितरतृप्तीनिमित्त तपोभूमी गुरूपीठ येेथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

खांडोळा:  आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या अमावास्येच्या दिनी सर्व हिंदू धर्मीय आपल्या पितरांना संतुष्ट करून आशीर्वाद प्राप्त करीत असतात. पितरांसाठी जे श्रद्धेने कार्य केले जाते ते श्राद्ध. भाद्रपद अमावास्या ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.

ज्या मनुष्याला आपल्या पितरांची  मृततिथी माहित नाही अशा सर्वांना पितृपक्षात कधीही श्राद्ध-तर्पण केले तर सर्व तिथींना त्याने श्राद्ध केल्याचे फळ प्राप्त होते। त्यामुळे सर्व पितरांचे श्राद्ध करण्यासाठी ही तिथी महापुण्यदायक मानली गेली आहे.

श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्'' म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल असे वागणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव, पितर ,ऋषी यांच्या कार्यात अडथळा आणू नये तसेच संशय बाळगून प्रमाद करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. 

किंबहुना सुशिक्षितांनी या सूक्ष्म विषयांवर अभ्यास जरूर करावा जेणे करून नेमका गूढार्थ आपल्याला कळेल ज्यात पूर्वजन्म व पुनर्जन्म सिद्धांत एवं शाश्वत विचार दडलेला आहे. 

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आज समस्त हिंदू धर्मियांद्वारे स्वकुळातील पितर तृप्तीसाठी घरोघरी १०८ वेळा विष्णू सहस्रनाम पाठ, दानधर्म , शास्त्रचर्चा एवं शिष्यांद्वारे गुरुमंत्र जपानुष्ठान संपन्न होणार आहे.

 तसेच दुपारी १२:३० वाजता राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी समाधी महापूजा तथा आरती तसेच पंचपक्वान्न देवता भोजन संपन्न होणार आहे.  संध्याकाळच्या सत्रात ठीक ८:३० वाजता सर्वपित्री अमावस्या विशेष दत्तगुरुवार भक्ती उत्सव निमित्त धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे दिव्य आशीर्वचन संपन्न होणार आहे. 

समस्त हिंदू धर्मियांनी अशा या सर्वपित्री अमावस्येच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या संस्कृतीचे अनुकरण करावे असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठाचे महाप्रबंधक शुभक्षण नाईक यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या