पेडण्याच्या पुनाव उत्सवात शुकशुकाट

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे या अशा मोठ्या उत्सवावर बऱ्याच मर्यादा आल्याने दरवर्षी गजबजणाऱ्या या उत्सवाच्या सगळ्याच परिसरात आज  शांतता आणि  शुकशुकाट पाहावयास मिळाला.

पेडणे:  पेडण्याचा प्रसिद्ध ‘पुनाव’ (दसरोत्सव) हा राज्यातील एक मोठा उत्सव. राज्यातील भाविकांबरोबरच शेजारच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातही  या देवतांचे मोठ्या प्रमाणात भाविक आहेत. श्री भगवती मंदिर, श्री रवळनाथ मंदिर व आदीस्थान या तिन्ही मंदिरांबरोबरच या देवस्थानाशी संलग्न अशा इतर मंदिरातून हा उत्सव अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. 

या उत्सवाला दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती होत असते. सगळीकडचा परिसर विविध प्रकारच्या फेरीच्या दुकानांनी  भरगच्च भरला जायाचा. जी वस्तू ऐरवी कुठे बाजारात सापडायाची नाही, ती वस्तू हमखास या पुनवेच्या फेरीत मिळायची. लाखो रुपयांची उलाढाल व्हायची, पण यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे या अशा मोठ्या उत्सवावर बऱ्याच मर्यादा आल्याने दरवर्षी गजबजणाऱ्या या उत्सवाच्या सगळ्याच परिसरात आज  शांतता आणि  शुकशुकाट पाहावयास मिळाला.

श्री भगवती मंदिरात या उत्सवाच्या दिवशी देवदर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागायच्या व या रांगा रस्त्यापर्यंत पोहचायच्या. त्यानंतर श्री रवळनाथ मंदिरात भाविकांची रिघ लागलेली असायाची, तर आदीस्थान देवाचा मांगर येथे जिथे रवळनाथ व भुतनाथ देवाची तरंगे असतात अशा दोन्हीकडे भाविकांच्या दूरपर्यंत रांगा लागायच्या, पण आज भाविकांऐवजी मंदिरात व सगळीकडे बंदोबस्तासाठी आलेले पोलिस मात्र दिसत होते.

भगवती मंदिराच्या प्रशस्त अशा आवारात मुलांच्या खेळण्याची, पितळ, स्टीलची भांड्याची, रेडीमेड कपड्यांची, दुसऱ्या दोन बाजूंना खाजे आदी मिठाईची दुकाने, मंदिराच्या एका बाजूला जाइंट व्हील, दुसऱ्या बाजूला फर्निचर, विविध प्रकारची कपाटे, मंडपात दोन्ही बाजुंनी व मंदिराच्या बाहेर फुल विक्रेत्या महिलांच्या रांगा, गांधी पुतळ्यासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अशाच प्रकारचे विविध फेरी विक्रेत्यांची लागलेली रांग पालिका उद्यानाकडून पालिका इमारत ते पोलिस ठाण्यासमोरील जागेत दोन्ही बाजूंनी अनेक विविध प्रकारचे फेरीवाले असायचे, तर आदीस्थानच्या बाजूने काही फेरीवाले असायचे. यंदा मात्र ही चित्र पाहावयास मिळाले नाही.

भगवती मंदिर परिसर, खाली मुख्य रस्त्यावर भाविकांची पाय टाकायाला जागा नाही अशी अलोट गर्दी होत होती. एका मंदिरात दर्शन घेऊन दुसऱ्या मंदिरात आणि दुसऱ्या मंदिरातून तिसऱ्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक जात असल्याने तर काही फेरीतील दुकानावर खरेदीसाठी गर्दी मिळून पेडणे शहराचा सगळा भाग रात्रभर गजबजायचा. फेरीतील दुकाने तर दोन तीन आठवडाभर असायची. फेरीतील काही दुकाने दिवाळीपर्यंत असायाची, पण यंदा कोरोना महामारीमुळे सगळीकडे सामसुम अशा वातावरणात प्रथमच हा उत्सव साजरा झाला.

संबंधित बातम्या