मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र नेणे हिताचे

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

मेळावली-सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची जागा ही पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. ही जागा आयआयटी करता अनुकूल आणि योग्य नाही. ह्या जागेत संवेदनशील जंगल संपदा आणि जलस्त्रोत आहेत. तसेच या जागेजवळ बोंडला आणि म्हादई अभयारण्य आहे आणि म्हणून हा प्रकल्प येथून दुसरीकडे नेणेच सर्वांच्या हिताचे आहे,

गुळेली :मेळावली-सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची जागा ही पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. ही जागा आयआयटी करता अनुकूल आणि योग्य नाही. ह्या जागेत संवेदनशील जंगल संपदा आणि जलस्त्रोत आहेत. तसेच या जागेजवळ बोंडला आणि म्हादई अभयारण्य आहे आणि म्हणून हा प्रकल्प येथून दुसरीकडे नेणेच सर्वांच्या हिताचे आहे, अशी मागणी सत्तरीतील सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई यांनी प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या जागेचे प्रत्यक्ष फिरून आणि त्या जंगलात आत जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर केली.

अॅड देसाई म्हणाले, म्हादई आणि बोंडला अभ्यारण्यामध्ये मेळावली हा गाव येतो. ह्या गावातील जंगलाची नोंदणी एक चौदाच्या उताऱ्यावर नाही, याचा अर्थ इथे जंगल नाही असा होत नाही. एक जंगल दुसऱ्या जंगलावर अवलंबून असते हा नैसर्गिक सिद्धांत आहे. एका जंगलातील प्राणी दुसऱ्या जंगलात नेहमी ये-जा करत असतात. पाण्याचे नैसर्गिक स्रोत देखील एका जंगलातून दुसऱ्या जंगलात आणि आजूबाजूच्या गावात जात असतात. मेळावलीच्या जंगलाच्या खालच्या भागात पाण्याची तळी आहे. जंगलाच्या मध्यभागीखोलवर भागात पाण्याचे स्त्रोत आहेत. याचा अर्थ असा होतो की, ह्या जंगलात पाण्याचा स्त्रोत राखून ठेवणारी झाडे आहेत. म्हणजे जंगलातील हे पाणी जरी आपल्याला एका ठिकाणी दिसत असले. तरी हे पाणी जमिनीतून अनेक भागात जात असते. याचाच अर्थ असा की, आजूबाजूचा परिसर देखील ह्या पाण्यावर अवलंबून असतो. जनावरे माणसे देखील ह्या पाण्यावर अवलंबून असतात. मध्यभागी जिथे पाणी दिसले तिथे दलदल आणि चिखल आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की, जंगलाच्या जमिनीत पाण्याचे स्त्रोत आहेत. जवळच बोंडला अभ्यारण्य आणि म्हादई अभयारण्य आहे. एकमेकाला टेकून असलेली जंगले आणि तेथील प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. 

आयआयटी प्रकल्पामुळे जर मेलावलीच्या घनदाट जंगल आणि तेथील झाडे नष्ट झाली तर त्याचा परिणाम म्हादई आणि बोंडला अभयारण्यावर पडेल. एवढेच नव्हे, तर त्यामुळे ह्या जंगलातील जलस्त्रोत देखील नष्ट होतील आणि त्याचा परिणाम सत्तरी तालुक्यातील मेलावलीच्या आजूबाजूला असलेल्या गावांना भोगावा लागेल. सत्तरी तालुक्यात आजही टँकरद्वारे असंख्य गावांना पाणी पुरविले जाते. जंगलातील प्राणी हे केवळ एकच जंगलावर अवलंबून नसतात. तर एका जंगलातून अनेक जंगलात फिरत असतात आणि मेलावलीचे जंगल जरी सर्व नकाशावर लागले नसले तरी ते जंगल आहे आणि ते म्हादई आणि बोंडला अभ्यारण्याच्या मध्यभागी आहे. ह्या जंगलात असंख्य संवेदनशील झाडे आणि झुडपे आहेत, अशी झाडे आणि झुडपे उभी व्हायला हजारो वर्षे लागतात. एक दोन, शंभर किंवा दोनशे झाडे कापणे ठीक. पण, हजारो लाखो उभी झालेली केवळ विकास म्हणून कापणे. मग येणाऱ्या पिढीला भयंकर निसर्गाचे, पर्यावरणाचे परिणाम भोगायला लावणे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी केला. 

लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न
प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या जागेत जल्मी देवस्थान नंतरचे दुसरे वाघेरी कुळ देवस्थान आहे. गावातील वाघेरकर आणि गावकर यांचे हे देवस्थान. जवळपास ७५ टक्के वाघेरकर आणि गावकर हे लोक या गावात राहतात. लग्नकार्य असो किंवा कोणतेही कार्य असो हे लोक चांगल्या कार्याची सुरवात करताना या देवाला सुरवातीला नमन करतात. हे देवस्थान जुने आहे. मुख्य रस्त्यावरून प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या जागेतून जाण्यासाठी या देवळाकडे छोटासा रस्ता आहे आणि बाजूला जंगल आहे. तसेच ह्या प्रकल्पामुळे सध्या मेळावली आणि आजूबाजूच्या गावच्या लोकांच्या अस्तित्वाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने आता विचार करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या