म्हापसा शहर, परिसरात भुरट्या चोऱ्यांना ऊत

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

गणेशपुरी रहिवाशांकडून पोलिसांना निवेदन सादर

शिवोली

गेले दोन महिने राज्यात लागू असलेल्या टाळेबंदीच्‍या पार्श्वभूमीवर बहुतांश परप्रांतीयांनी गोवा सोडलेला आहे, तरीही म्हापसा शहर तसेच उपनगरात भुरट्या चोऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. हाऊसिंग बोर्ड परिसरात सध्या भुरट्या चोरांनी थैमान घातल्याचे स्थानिकांच्‍या तक्रारी असून पोलिसांनी गस्‍त घालावी, अशा मागणीचे निवेदन गणेशपुरी रहिवाशांकडून पोलिसांना देण्‍यात आले.
टाळेबंदीच्‍या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा ‘कोविड-१९’च्‍या प्रतिबंधात्मक कार्यात मग्न असल्याची संधी साधून भुरटे चोर बार्देशातील बहुतेक रहिवासी परिसरात गोंधळ माजवीत असल्याचे स्थानिकांच्या तक्रारी आहेत. भुरट्या चोरांपासून हैराण झालेल्या गणेशपुरी (हाऊसिंग-बोर्ड ) रहिवासी संघटनेतर्फे अध्यक्ष विश्वास पिळर्णकर, दत्ता खोलकर, सलीम ईसानी, आशिष शिरोडकर, तसेच नगरसेवक संजय मिशाळ यांच्यासमवेत म्हापसाचे पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
पोलीसांना सादर केलेल्‍या निवेदनात हाऊसिंग-बोर्ड परिसरात गेल्या चार महिन्यांत आठ घरफोड्यांची प्रकरणे दिवसाढवळ्या घडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. गणेशपुरी हाऊसिंग बोर्ड कॉलनीत सुमारे अडीचशे ते तीनशे मध्‍यमवर्गीय तसेच श्रीमंत लोकांची घरे आहेत. आतापर्यंत या भागात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश न आल्यामुळे अखेरचा उपाय म्हणून नगरसेवक संजय मिशाळ यांच्या सहकार्याने पोलिस उपअधीक्षकांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गणेशपुरी सोसायटीचे दत्ता खोलकर यांनी सांगितले.
म्हापशाचे उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी हाऊसिंग-बोर्ड परिसरात कडक पोलिस पहारा ठेवण्याचे स्थानिक रहिवासी संघटनेला आश्वासन दिले. तसेच गणेशपुरीतील रहिवाशांनी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या