सावईवेरे येथे बिअर टीनमध्ये अडकलेल्या सापाची सुटका

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

‘अरे, माणसा कधी जाणशील मुक्या जीवांचे महत्त्व...’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सावईवेरे येथे रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या बिअर टीनमध्ये धामण (रॅट स्नेक) अडकण्याचा प्रकार घडला आहे

पणजी: ‘अरे, माणसा कधी जाणशील मुक्या जीवांचे महत्त्व...’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. सावईवेरे येथे रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या बिअर टीनमध्ये धामण (रॅट स्नेक) अडकण्याचा प्रकार घडला आहे. सावईवेरे येथे अनुप नाईक यांना बिअर टीनमध्ये तोंड अडकलेली धामण दिसली. त्यांनी प्राणीमित्र चरण देसाई यांना फोनवरून कल्पना देताच देसाई यांच्यासह अंकित गावणेकर आणि मधुराज नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरेकतऱ्हेने प्रयत्न करून त्यांनी या धामणीचे तोंड बाहेर काढले आणि मुक्या जीवाला मुक्त केले. त्यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा माणूस आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष अधोरेखित झाला आहे. 

या घटनेचा फोटो आणि व्हिडीओ चरण देसाई यांनी त्यांच्या फेसबुकवर ‘तुम्ही या वेदनेची कल्पना करू शकाल का?’ या ओळीसह शेअर केला होता. त्यामुळे अनेकांनी या प्रकाराचा निषेध करीत पोस्टवर कमेंट टाकल्या. तर काही लोकांनी हा प्रकार इतरांना कळवा म्हणून जनजागृती करण्यासाठी पोस्ट शेअर केली. पर्यावरण मित्र काका भिसे यांनी या पोस्टवर कमेंट करीत आंबोली परिसरात असेच एका प्लस्टिकच्या बाटलीत सापाचे तोंड अडकल्याची फोटो टाकला आहे. त्यामुळे आता माणसांनीच मुक्या जीवांचे महत्त्व जाणून त्यांना त्रास होणार नाही, या दृष्टीकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

संबंधित बातम्या