गोव्याची सांस्कृतिक परंपरा: संतसाहित्यामुळे गोमंतकीयांचे समाजप्रबोधन

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

‘विवेकाचे भांडार’ या दृष्टिकोनातून संतवाङ्‍मयाकडे आदरपूर्वक पाहिले जाते. संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी, लोकमानसाचा मन:पिंड घडवण्याचे अद्वितीय कार्य अशा स्वरूपाच्या माध्यमातून झालेले आहे.

‘विवेकाचे भांडार’ या दृष्टिकोनातून संतवाङ्‍मयाकडे आदरपूर्वक पाहिले जाते. संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी, लोकमानसाचा मन:पिंड घडवण्याचे अद्वितीय कार्य अशा स्वरूपाच्या माध्यमातून झालेले आहे. भारतभूमीत विविध धर्म आणि संप्रदाय प्राचीन काळापासून कार्यरत आहेत. अशा विविध जनसमुहांच्या मार्फत संतसाहित्याचा प्रभाव अप्रत्यक्षपणे वाङ्‍मय, शिक्षण, विज्ञान, कला, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रांवर पडलेला आहे. गोमंतकीय जनमानसावरही संतसाहित्याचा मोठा प्रभाव आहे आणि त्या माध्यमातून गोमंतकीयांचे समाजप्रबोधन झालेले आहे.

महाराष्ट्र आणि गोवा प्रांतालाही संतमहंतांची थोर परंपरा लाभलेली आहे. मराठीतील संत-सज्जन ही महाराष्ट्राची तसेच गोमंतभूमीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. अशा या वैभवसंपन्न संतसाहित्यामुळेच मराठी मुलखातील जनतेची वैचारिक जडणघडण झाली आहे. सुविचार आणि नीतिमत्ता या अंत:सूत्राने युक्त असलेल्या या संतांच्या विचारांची थोरवी जगात सर्वदूर पोहोचलेली आहे. संत तुकाराम महाराजांसारख्या संतांनी मांडलेला तत्त्वविचार पाश्चात्त्य तत्त्ववेत्यांपेक्षा कितीतरी पटींनी निश्चितच सरस आहे, हे आता जगभरील अभ्यासक मान्य करू लागले आहे.

तेराव्या शतकापासून महाराष्ट्राला लाभलेल्या संत निवृत्तीनाथ - ज्ञानदेव यांच्यापासून ते विसाव्या शककातील संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्यापर्यंतची महान परंपरा देदिप्यमान स्वरूपाची आहे. स्वधर्म रक्षण आणि परमार्थ अशा स्वरूपातील कार्याबरोबरच त्या संतांनी राष्ट्रोद्धाराचेही कार्य अप्रत्यक्षपणे साध्य केले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, रामदास आणि तुकाराम यांना ‘संतपंचक’ असे आदरपूर्वक संबोधले जाते. महानुभव, वारकरी, दत्त, समर्थ असे विविध संप्रदाय तसेच गाणपत्य, सौर, अवधूत, नागेश, देवी, शाक्त, जैन, वीरशैव, बौद्ध, शीख अशा काही प्रमुख धर्मसंप्रदायांचा वावर भारतभर झाला. तसेच, मोगल राजवटीमुळे सुफी व इंग्रजांच्या राजवटीमुळे इसाई या धर्ममतांचा पगडा महाराष्ट्र आणि गोमंतकावर होता. या विविध धर्मसंप्रदायांत मोठ्या संख्येने संत-महात्मे कार्यरत होते. संतसाहित्याचे अंतरंग सर्वांनीच समजून घेणे गरजेचे आहे.

सर्वसामान्यांचा समावेश असलेला वारकरी संप्रदाय हा बहुव्यापक आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाचा उल्लेख ‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ असा केला जातो. देशातील कुठल्याही संप्रदायाला संत-महंतांची वारकरी संप्रदायासारखी प्रदीर्घ परंपरा लाभलेली नाही. केवळ वारकरी संप्रदाय त्याबाबत अपवाद आहे. अर्थांत संत ज्ञानेश्वर ते संत गाडगे महाराज या टप्प्यापर्यंत मोठ्या संख्येने संतांनी वारकरी तसेच महाराष्ट्रीय भक्तिसंप्रदायासाठी योगदान दिलेले आहेत. यासंदर्भातील एक विशेष म्हणजे वारकरी परंपरेतील हे संत विविध वर्गांतील होते. त्यामुळे याच संप्रदायात खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूपातील समता आहे, असे म्हणावे लागेल. जाती-वर्ण भेदाला तिलांजली देऊन वारकरी पंथाच्या भगव्या झेंड्याखाली अठरा पगड जातीतील संतमंडळी एकत्रित झालेली आहे. त्यामध्ये संत जनाबाई, गोरा कुंभार, सांवता माळी, चोखामेळा आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, सेना न्हावी, नरहरी सोनार इत्यादींचा त्यात समावेश आहे.

संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा भरभक्कम पाया रचला व संत नामदेवांनी त्याचा विस्तार केला. ‘विठ्ठल-परब्रह्म’ या परमपूज्य दैवताच्या ओढीने भारेलेल्या त्या संतांनी ‘आध्यात्मिक लोकशाही’चा हेतू अप्रत्यक्षपणे साध्य केला आहे. भागवत संप्रदायाची भक्तिपरंपरा जरी निवृत्तीनाथांपासून सुरू झाली, तरी तत्त्वज्ञानाचा पाया ज्ञानदेवांनी रचला, असे संत बहिणाबाईंनी  म्हटले होते. त्या स्वत:च्या अभंगात म्हणतात, ‘‘संतकृपा झाली। इमारत फळा आली।। ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।।

 नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।। एका जनार्दनी खांब। ध्वज दिला भागवत।। तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’’
संत नामदेव यांनी वारकरी संप्रदायाचा भारतभर प्रचार-प्रसार केला. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रांतांत प्रवास करून त्यांनी उत्तर भारतातही विठ्ठलनामाचा प्रसार केला. त्यांनी ईश्वरभक्तीच्या माध्यमातून समता आणि मानवता या तत्त्वांचा प्रखरतेने पुरस्कार केला. ‘महाराष्ट्राचे खरेखुरे नाथ’ असे सार्थ संबोधन संत एकनाथ महाराजांच्या बाबतीत केले जाते. त्यांनी मोठ्या प्रमाणात वाङ्‍मयनिर्मिती केली असली तरी ‘भारूड’ प्रकारचे लेखन त्यांच्यामुळेच सर्वदूर पोहोचले आहे. संत तुकाराम महाराजांना ‘जगद्‍गुरू’ संबोधले जाते. त्यांनी जनसमुहाला सन्मार्गाकडे वळवण्याचे कार्य केले.

वारकरी संप्रदायात संत मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई, बहिणाबाई, वेण्णास्वामी, राजस्‍थानमधील मीरा, दक्षिण भारतातील अक्कमहादेवी अशा देशभराच्या विविध प्रांतांतील आणि विविध भाषांतील महिला संतांच्या सामाजिक तसेच आध्यात्मिक विचारांचा कमी-अधिक प्रमाणात महाराष्ट्र आणि गोव्यावरही पडलेला आहे.

संबंधित बातम्या