समाजकल्याण खात्याच्या इमारतीची दुरावस्था

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

पणजीतील १८ जून रस्त्याच्या बाजूला असलेल्या समाजकल्याण खात्याच्या इमारतीची अवस्था फारच बिकट झाली आहे. एक मजली असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यासाठी पोर्तुगीजकालीन काळात लाकडाचा वापर केला आहे

पणजी : पणजीतील १८ जून रस्त्याच्या बाजूला असलेल्या समाजकल्याण खात्याच्या इमारतीची अवस्था फारच बिकट झाली आहे. एक मजली असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यासाठी पोर्तुगीजकालीन काळात लाकडाचा वापर केला आहे. आता ते लाकूड पूर्णतः खराब झाले आहे. शिवाय छताची अवस्थाही बिकट झाली असून येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊनच वावरत असतात. 

लोककल्याणकारी योजना या खात्यातर्फे वापरल्या जातात. त्याच समाजकल्याण खात्यात योजनांसाठी येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. दिव्यांग व्यक्तीला जर संचालकांना किंवा उपसंचालकांना भेटावयाचे झाल्यास त्याला ते शक्य होत नाही. पर्यायी त्याला कोणाचातरी आधार घेऊन पहिल्या मजल्यावर जावे लागते. कधी-कधी संचालकांना स्वतःच खाली दिव्यांगांना भेटण्यासाठी यावे लागते. असा सगळा सिरस्ता कित्येक वर्षे या ठिकाणी सुरू आहे. आज ना उद्या चांगल्या इमारतीत या कार्यालयाचे स्थलांतर होईल, अशी अपेक्षा धरून कामावार येत असावेत. 

बुधवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जमाव उपसंचालकांच्या खोलीत गेला तेव्हा तो मजला टिकाव धरतोय की नाही, असे वाटत होते. कारण भिंतीच्या भोवतालचे लाकूड खराब झाल्याचे पाय ठेवल्यानंतर सहजपण जाणवते. अशा स्थितीत समाजकल्याण खात्याचा कारभार सुरू आहे. त्याचबरोबर छताच्यावर लावलेले प्लायवूडही निघून पडले असून, काही ठिकाणी भिंतीवर पाणी झिरपत असल्याच्या खुणाही दिसतात.

एका बाजूला राज्य सरकार काही कार्यालयांसाठी लाखो रुपये भाड्यापोटी देत आहे. परंतु या कार्यालयाचे स्थलांतर करण्यासाठी सरकारला निर्णय घेता येऊ नये, याबाबत येथील कर्मचारीच आश्‍चर्य व्यक्त करतात. राजधानीत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कार्यालयाची बाहेरून इमारत चांगली दिसते, पण आतून मात्र बेभरावशावर टिकून असलेला मजलाच नजरेस पडतो. या कार्यालयातील कागदपत्रेही ठेवण्यासाठी सुसज्ज व्यवस्था नाही. सर्व काही आलबेल असल्याचा प्रत्यय येतो. या खात्याचे मंत्री याठिकाणी कधी येतात की नाही, हाही प्रश्‍न या इमारतीची अवस्था पाहिल्यानंतर उपस्थित होतो.

संबंधित बातम्या