सामाजिक कार्यकर्त्यांकडून फादर स्टॅन स्वामी यांच्या मुक्ततेची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सहभागी होण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एनआयने त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्याच्या (यूएपीए ) अंतर्गतही गुन्हे दाखल केले आहेत. फा. स्टॅन यांच्या कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसतानाही त्यांना अटक करण्यात आल्याचे फा. सायमन फर्नांडिस यांनी सांगितले. 

पणजी- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना नुकतीच राष्ट्रीय तपास यंगणेने (एनआयए) अटक केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते आज आझाद मैदानात भर पावसात एकवटले. याप्रसंगी फा. स्टॅन यांना त्वरित मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी कुर्टी आदिवासी समाजाचे नेते मोर्तु गावडे, शशिकांत वेळीप यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

रांची येथील छोटा नागपूरमधील बगाईचा भागातल्या त्यांच्या कार्यालयातून त्यांना ता. ८ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गेलेल्या एनआयएच्या पथकाने अटक केली आहे.  स्टॅन स्वामी त्यांच्या कार्यालयातल्याच एका खोलीत एकटे राहतात.

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सहभागी होण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एनआयने त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्याच्या (यूएपीए ) अंतर्गतही गुन्हे दाखल केले आहेत. फा. स्टॅन यांच्या कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसतानाही त्यांना अटक करण्यात आल्याचे फा. सायमन फर्नांडिस यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, आदिवासींच्या हक्कांसाठी पुढाकार फा. स्टॅन यांनी घेतला म्हणून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून ते अन्यायकारक आहेत. झारखंडमधील आदिवासींना जमीन मालकी हक्क देण्यासाठी ४० वर्षे लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध आहे, असा संशय घेऊन त्यांना अटक केली जाते, हा प्रकार आवाज दाबण्याचा आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने फा. स्टॅन यांना पाठिंबा दर्शवित आहोत. तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फा. स्टॅन यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांना मुक्त करण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या