‘जनतेची सेवा करणाऱ्यांचा समाज उपकारी राहील’

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

कोविड महामारीच्या काळात वेळप्रसंगी स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष करीत समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्यांच्या वैद्यकीय तसेच पोलिस दलाच्या उपकारात समाज सदोदीत राहाणार असून तेच या लढ्यातील खरेखुरे योद्धे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी हणजुणे येथे केले.

 शिवोली :  कोविड महामारीच्या काळात वेळप्रसंगी स्वतःच्या परिवाराकडे दुर्लक्ष करीत समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्यांच्या वैद्यकीय तसेच पोलिस दलाच्या उपकारात समाज सदोदीत राहाणार असून तेच या लढ्यातील खरेखुरे योद्धे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी हणजुणे येथे केले. दरम्यान, देशात कोविडचा प्रभाव जरी कमी झालेला असला तरी कुणीही याबाबतीत बेसावध राहाता कामा नये असा इशाराही त्यांनी दिला.

हणजुणे पंचायत कार्यालयात शनिवारी संध्याकाळी आयोजित कोविड वॉरियर्सच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवोलीचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर, हणजुण कायसुवचे सरपंच पीटर सावियो आल्मेदा, उपसरपंच सौ. शितल नाईक तसेच झंडू फार्मासिट्युकल्सचे डॉ. सावंत उपस्थित होते.  सुरवातीला आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते खासदार निधीद्वारे पंचायत इमारतीत सुरू करण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे फीत कापून उद्‍घाटन करण्यात आले. यासाठी खासदार निधीद्वारे अंदाजे दहा लाखांची जीम उपकरणे खरेदी करण्यात आल्याचे आयुषमंत्री नाईक यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात मातृभूमी प्रतिष्ठान तसेच झंडू फार्मासिट्युकल्सद्वारे शिवोली मतदारसंघनिहाय कोविड वॉरियर्सना प्रशस्तीपत्र तसेच मानचिन्ह देऊन जाहीर गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे गौरवमूर्तींना  विशेष कोविड कीट प्रदान करण्यात आले. दरम्यान, शिवोली आरोग्य केद्राच्या वैद्यकीय सेवेतील डॉ. साधना शेट्ये तसेच त्यांची टीम आणि हणजुण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुरज गावस, वाहतूक विभागाचे वामन नाईक यांचा आयुषमंत्र्यांनी गौरव केला. 
दरम्यान,  हणजुण पंचक्रोशीतील हायस्कुलात  यंदाच्या शालांत परिक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचाही आयुषमंत्री श्रीपाद नाईक तसेच स्थानिक आमदार विनोद पालयेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संबंधित बातम्या