Som Yag Yadnya 2023: सोमयाग म्हणजे काय?

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023Gomantak Digital

Som Yag Yadnya Festival 2023 Goa

संदीप सिद्धये

वेदकालीन सोमयाग व आधुनिक यज्ञयाग वेगळे. सकृतदर्शनी दिसणारा महत्त्वाचा फरक आहुती समर्पण करताना आपण ऐकलेले शब्द.

गोवा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्यातले सगळ्यांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गोमंतकीयांची भाविक वृत्ती. अत्यंत साधेपणा, एक प्रकारचा भोळेपणा, संस्कृतीचे प्रामाणिक जतन, मग ती फार पूर्वीची जुनी संस्कृती असो किंवा मध्य काळातील संस्कृती असो किंवा आता हळूहळू पर्यटन विकास वगैरे या दृष्टीने जपण्याची संस्कृती असो. सर्व बाजूंनी ती जपली जाते. होंडा, मुळगाव, अंत्रुज, बार्देश यासह अन्य भागातील अतिशय दुर्लभ अशी भव्य मंदिरे, त्यांचे पालखी, रथ वगैरे उत्सव, गणेशोत्सवात किंवा मंदिरांमध्ये चालणारी भजने, नाट्यसंगीताचे कार्यक्रम, संगीत नाटके, दशावतार, दहीकाला, अगदी पारंपरिक घुमट वाद्याच्या साहाय्याने आरत्या आणि अर्थातच मासे, सागरी अन्न इथपासून ते गोव्यात विविध ठिकाणी असणारी चर्च, सगळेच अतिशय सुंदर जपलेले आहे. तेही भाविकतेने आणि मनापासून जपणारे गोमंतकीय.

हे सगळे मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण म्हणजे ५ फेब्रुवारीपासून म्हापशाला सोमयाग होणार आहे. हा ‘सोमयाग’ म्हणजे नेमके काय असते, हे जाणून घेणे त्या निमित्ताने फार महत्त्वाचे आहे. सोमयाग हा नावाप्रमाणेच एक फार मोठा यज्ञ असतो, हे सांगायची काही आवश्यकता नाही. पण, आपण जे सर्वसामान्यपणे जे यज्ञ बघतो, मग ते वास्तुशांती, जनन शांती वगैरे सारखे घरगुती स्वरूपाचे असो किंवा शतचंडी, सहस्रचंडीसारखे काही सार्वजनिक स्वरूपाचे याग असो, किंवा कुठल्यातरी वैशिष्ट्यपूर्ण मंत्रांचे याग, देवतांच्या स्थापनेवेळी केले जाणारे याग अशा प्रकारचे यज्ञयाग आपणास सर्वसाधारणपणे माहीत असतात. हे सर्व यज्ञयाग जरी वेदांवर, श्रुतीस्मृती जरी आधारित असले तरी, ते पूर्णपणे वेदात्मक स्वरूपाचे नाहीत. ते बहुतांश पुराणांवर आधारित आहेत. वेदकाळातील यज्ञयागांचे स्वरूपच वेगळे होते. त्यातला अत्यंत महत्त्वाचा म्हणजे सोमयाग.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: गोव्यात होणाऱ्या यज्ञ उत्सवाची ६ वैशिष्ट्ये माहितीये का?

हा सोमयाग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय, इथपासून ते त्याची फलश्रुती काय, त्याचे महत्त्व काय, हे आपण जाणून घेऊ. हे क्रमवार जाणून घेण्याआधी त्यातील फरक जाणून घेणे अत्यावश्यक आहे. वेदकालीन सोमयाग व आधुनिक यज्ञयाग वेगळे. सकृतदर्शनी दिसणारा महत्त्वाचा फरक आहुती समर्पण करताना आपण ऐकलेले शब्द. आपण बरेचसे यज्ञ स्वाहाकाराने ऐकले असतील, म्हणजे अमुक स्वाहा, तमुक स्वाहा असे. काही काही नम:कार म्हणजे अमुक नम:, तमुक नम: ऐकलेले असतील. काही स्वधाकार ऐकले असतील. स्वधाकार यज्ञ म्हणून कमी होतात, पितृकार्य करतो तेव्हा ‘अमुक स्वधा’, ‘तमुक स्वधा’ हे शब्द आपल्या कानावर पडतात. स्वाहा, स्वधा, नम: हे जे शब्दप्रयोग आहेत, ते यज्ञातील आहुती समर्पणाचे दर्शन घडवणारे आहेत. आधुनिक काळामध्ये या प्रकारचेच यज्ञ आपण पाहतो. पण, वेदकाळामध्ये म्हणजे २००० वर्षांपूर्वीपर्यंत वेदांमधीलच यज्ञ प्रामुख्याने केले जात. वेदकालीन यज्ञातील आहुतींचे समर्पण स्वाहा, स्वधा, नम: या शब्दांनी शेवट होणाऱ्या मंत्रांनी न होता, त्या वषट्काराने शेवट होणाऱ्या मंत्रांनी समर्पित केल्या जात. मंत्र म्हणून त्याचा शेवट ‘वंषट्’ असा उच्चार करून आहुती दिली जात असे. आपण हा प्रकार याआधी क्वचितच पाहिला असेल. कारण, हा वेदकाळात प्रचलित असलेला प्रकार होता.

Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023: गोव्यात यज्ञ उत्सव, कधी आणि कुठे वाचा सविस्तर

हे ढोबळमानाने दिसणारे वैशिष्ट्यासह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत व त्यामागची भूमिका लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला सोमयागाचा आनंद घेता येणार नाही. बऱ्याचदा आपण एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देतो तेव्हा तिथे असलेला मार्गदर्शक त्या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व सांगतो. ते ऐकल्यानंतर आपल्याला त्या स्थळाचे विशेषत्व जाणवू लागते. आपण जेव्हा त्या ठिकाणाशी संबंधित ऐतिहासिक घटना ऐकतो तेव्हा त्या किल्ल्याचे, शस्त्रास्त्रांचे, ठिकाणाचे एक वेगळेच महत्त्व आपल्या नजरेस पडते. त्यातले बारकावे समजतात, त्याचे महत्त्व पटते. तसेच सोमयागाविषयी माहिती https://www.dainikgomantak.com/ वर वाचलीत तर ५ तारखेपासून प्रत्यक्ष सोमयाग पाहताना आपल्याला त्यातील आनंद घेता येईल.

अन्यथा पुरोहित, गुरुजी लोक आले, काहीतरी म्हटले आणि बरेच दिवस हवन वगैरे केले, या पलीकडे काही उमगणार नाही. सोमयाग हा दुर्लभ प्रकार आहे, त्यामुळे भटाब्राह्मणांची काहीतरी अगम्य बडबड असे न होता, त्यातील अर्थ कळावा, हा त्यामागील हेतू आहे. सोमयाग खास आहे, विशेष आहे म्हणूनच तो समजून उमजून त्यात सहभागी होणे जास्त आवश्यक आहे. त्यासाठी जी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊ. विस्ताराने सोमयाग जाणून घेण्यासाठी लिहायचे झाल्यास सहज एक मोठा प्रबंध होईल. पण, निदान तोंडओळख तरी होणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com