राहूल समवेत सोनिया गांधी विश्रांतीसाठी गोव्यात ; दिल्लीतील प्रदुषणातून बाहेर पडण्याचा डॉक्टरांनी दिला होता सल्ला

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

छातीत झालेल्या दुखापतीमुळे त्यांना डॉक्टरांनी दिल्लीतील प्रदुषणातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. आज दुपारी पणजी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. 

पणजी- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहूल गांधी गोव्यात दाखल झाले आहेत. छातीत झालेल्या दुखापतीमुळे त्यांना डॉक्टरांनी दिल्लीतील प्रदुषणातून बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. आज दुपारी पणजी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. 

दरम्यान, सोनिया गांधी यांना छातीत आणि फुस्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी आरामाचा सल्ला दिला होता. यासाठी त्यांना दिल्लीतील प्रदूषणापासून दूर जाऊन मुक्त वातावरणात विश्रांती घ्यावी, असे डॉक्टरांनी म्हटले होते. डॉक्टरांचा हा सल्ला मानत त्यांनी आपले पुत्र व काँग्रेस नेते राहूल गांधी यांना बरोबर घेत गोवा गाठले. पुढचे काही दिवस त्या येथेच विश्रांती करणार असून पक्षासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागल्यास त्या येथूनच जाहीर करतील अशी शक्यता आहे. 

सोनिया गांधी या विश्रांती घेण्यासाठी मुक्त वातावरणात आल्या असून काही राजकीय भेटीगाठी किंवा गोव्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्या घेतील काय, याबाबतही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत काँग्रेसने अतिशय निराशाजनक कामगिरी केल्याने स्वपक्षीयांकडूनच त्यांना घरचा आहेर मिळत आहे. या निराशाजनक वातावरणातूनही दूर जात चिंतन करण्यासाठीही त्यांच्याकडे वेळ आहे. गोव्यातील काळ त्यांना व पक्षाला किती लाभदायी ठरतो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.  
 
 

 

संबंधित बातम्या