आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्राची लवकरच स्थापना

Avit bagale
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

गोवा सरकारने आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाशी (एनएसडीसी) आज सामंजस्य करार केला. कौशल्य विकास उद्योजक केंद्रीयमंत्री महेंद्र नाथ पांडे व गोव्याचे कौशल्य विकासमंत्री विश्‍वजित राणे यांच्या उपस्थितीत या करारावर ऑनलाईन पद्धतीने स्वाक्षऱ्या झाल्या. हे केंद्र उत्तर गोव्यातील जुने आझिलो इस्पितळाच्या इमारतीत स्थापन केले जाणार आहे.

अवित बगळे

पणजी :

आरोग्याची काळजी, पर्यटन आदरातिथ्य तसेच व्यवसायात आवश्‍यक असलेल्या मागणीनुसार या संस्थांमार्फत अत्याधुनिक प्रगत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी ऑनलाईन पद्धतीने बोलताना केंद्रीयमंत्री पांडे म्हणाले, नव्या परिवर्तनाच्या युगात प्रवेश करत असताना नोकरीच्या भविष्यासाठी अत्यंत उप्तादनक्षम व कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी देशभरातील कौशल्य प्रयत्नांना चालना देण्यासाठी या मिशनमध्ये सर्वांनी एकत्रित गुंफण्‍याची गरज आहे. देशाच्या पुनरुज्जीवन रणनीतीचा भाग म्हणून फेरकौशल्य, उन्नतकौशल्य व सखोल कौशल्य या तिन्हीवर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यासाठीच हा एनएसडीसी व गोवा यांच्यात सामंजस्य कराराने ते साध्य करण्याच्या दिशेने पाऊल आहे असे ते पुढे म्हणाले.

कौशल्‍यपूर्ण रोजगारनिर्मिती : विश्‍वजित राणे
गोव्याचे कौशल्य विकासमंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, गेल्या दशकामध्ये भारताच्या विकास दरामध्ये पर्यटन व आदरातिथ्य या क्षेत्रात गोव्याचे योगदान मोठे आहे. विकसित तंत्रज्ञान आणि उद्योजक क्षेत्रात कौशल्य कामगार वर्गाची मागणी असेल, त्यानुसार नवनवे तंत्रज्ञानाचे तरुणांना प्रशिक्षण देऊन नवीन प्रेरणा देण्यात येणार आहे. त्यामुळे कौशल्य कामगार उद्योजकतेसाठी उपलब्ध होईल, त्याचबरोबर रोजगार मिळणार आहे. या केंद्रामुळे कौशल्य प्रशिक्षणाची गती आरोग्य क्षेत्रात वेगाने वाढण्यास मदत होईल.
त्याचबरोबर इतर क्षेत्रातील प्रशिक्षणाचा फायदाही गोव्यातील तरुणांना होणार आहे. ही संस्था गोव्यातील तरुणांना नोकरीच्या शोधात न राहता त्यांना रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत मदत होईल व राज्याच्या विकासालाही वेगाने गती देईल. हे कौशल्य प्रशिक्षण पंतप्रधान योजनेखाली काही संस्थांच्या मदतीने दिले जाणार आहे. या संस्थेतर्फे रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही संस्था गोव्यात स्थापन करण्यास केंद्राने मार्गदर्शन व पाठिंबा दिल्याबद्दल मंत्री राणे यांनी आभार व्यक्त केले.

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या