दक्षिण गोवा हॉस्पिटल अद्ययावत होणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भविष्याच्यादृष्टीने सर्व सुविधा निर्माण केल्या जातील. एक उत्तम इमारत उभारण्यात आली असून, हळुहळू याठिकाणी सर्वोत्तम उपकरणांद्वारे सर्व सुविधा उपलब्‍ध असतील.

पणजी : दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भविष्याच्यादृष्टीने सर्व सुविधा निर्माण केल्या जातील. एक उत्तम इमारत उभारण्यात आली असून, हळुहळू याठिकाणी सर्वोत्तम उपकरणांद्वारे सर्व सुविधा उपलब्‍ध असतील. त्याचबरोबर घरगुती विलगीकरणातील रुग्णांच्या निरीक्षणासाठी यापूर्वी ठेवलेल्या दहा दिवसांच्या कालावधीवरून ते १७ दिवसांवर नेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

राणे म्हणाले की, आरोग्य विभागाने घरगुती विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर देखरेख करण्याकरीता दहा दिवसांचा कालावधीत ठरवला होता, परंतु तो आता १७ दिवसांवर नेला आहे. वैद्यकीय शास्त्राच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची घरगुती रुग्णांवर देखरेख करण्यासाठी मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची संमती घेतली जाईल. त्यासाठी मानक कार्यप्रणाली ठरविली जाईल, हे वर्ग सुरू करण्याविषयी अधिष्ठाता शिवानंद बांदेकर हे योजना आखतील. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भविष्याचा विचार करून सर्व सुविधा निर्माण केल्या जातील त्याचबरोबर याठिकाणी २१ खासगी खोल्याही असतील. अतिदक्षता विभागाचीही निर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद 
केले. 

कोरोना निरीक्षकामुळे रुग्‍णांचे वाचले प्राण
राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, तर दुसरीकडे रुग्णालयातील रिक्त बेडची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्‍या रुग्णसंख्येत व मृत्यूच्या संख्येतही घट होत असल्याने गोमेकॉतील इतर प्राथमिक दर्जाच्या आरोग्य सुविधा सुरू केल्या जातील. त्याचबरोबर परिचारिकांची निवासाची सोय कायम राहील. याविषयी आपण मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली आहे, असेही राणे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. तसेच घरगुती विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर निरीक्षक ठेवत असल्याने ५० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचल्याचेही राणे यांनी आवर्जून नमूद केले.

संबंधित बातम्या