गांधीजयंतीदिनी  गोव्यातील १९१ ग्रामसभांचे आयोजन

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून अहवाल घेण्याची ‘गोवा कॅन’कडून मागणी

म्हापसा:  गोव्यातील १९१ पंचायतींच्या ग्रामसभा गांधीजयंतीदिनी अर्थांत २ ऑक्टोबर रोजी होणार असून, ‘कोविड,१९’च्या परिस्थितीत त्या ग्रामसभांचे प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे होण्यास पुढाकार घेण्याची मागणी करणारे निवेदन पंचायत संचालक नारायण गाड यांना ‘गोवा कॅन’ने सादर केले आहे.

पंचायतींच्या कामकाजाशी जास्त संबंध असलेली समाजकल्याण, महिला व बालकल्याण विकास, कृषी, पशुसंवर्धन, मच्छीमारी, वन, अनुसूचित जमाती कल्याण, पर्यटन, कौशल्य विकास व उद्यमशीलता अशा काही प्रमुख खात्यांना निमंत्रित करावे. तसेच शासकीय योजना, कौशल्य प्रशिक्षण, अर्थसंकल्पीय तरतुदी इत्यादींसंदर्भातील अहवाल ग्रामसभांमध्ये सादर करण्याची सूचना त्यांना करावी, अशी मागणी ‘गोवा कॅन’ने केली आहे.

दरवर्षी २ ऑक्टोबर, १९ डिसेंबर व २६ जानेवारी अशा सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी अशा ग्रामसभा सर्वच पंचायतीच्या होत असून, अशा सर्वच ग्रामसभांना विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवावे. सर्व सबंधित खात्यांचा गट विकास कार्यालयाच्या प्रयत्नांतून या ग्रामसभांत सहभाग असावा यासाठी पूरक यंत्रणा संचालकाने उभारावी, असे यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन १५ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन असल्याचे औचित्य साधून सरकारला सादर केल्‍याची माहिती ‘गोवा कॅन’चे संघटक रोलंड मार्टिन्स यांनी दिली. ग्रामसभांची खऱ्या अर्थाने फलश्रुती व्हावी, याची दक्षता घेणे सरकारचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, सर्व पंचायतींची संकेतस्थळे कार्यन्वित करणे व सिटिझन चार्टर तयार करणे यासंदर्भात पंचायत संचालकांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकांच्या नोकऱ्या जाणे, पगारात कपात होतणे, महसुलात घट होणे, शैक्षणिक संस्था बंद असणे, गुन्हेगारीत वाढ अशा विविध कारणांस्तव ग्रामीण भागांत सामाजिक तथा आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे, ऑक्टोबर ते मार्च या आगामी सहा महिन्यांचा काळ गोमंतकीयांसाठी कठीण ठरणार आहे. याची दखल घेऊन ग्रामवासीयांच्या हितार्थ पंचायत संचालनालयाने प्रशासकीय स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी.— रोलंड मार्टिन्स, संघटक, ‘गोवा कॅन.
 

संबंधित बातम्या