श्रावणातील रविवारला गोव्यात विशेष महत्त्व

श्रावणातील रविवारला गोव्यात विशेष महत्त्व
श्रावणातील रविवारला गोव्यात विशेष महत्त्व

श्रावणाचा नजारा सगळीकडं सारखा असतो. सृष्टी हिरवा शालू पांघरून नटलेली असते. कधी धुव्वाधार पाऊस तर कधी ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. धार्मिक आणि सण उत्सवामुळे वातावरणात चैतन्य भरलेले असते. प्रचंड पाऊस पडणाऱ्या गोव्यातही श्रावणातली रंगांची उधळण असते. पावसाच्या तालाला समुद्राच्या लाटांची साथ मिळत असते.

गोव्यातही श्रावण महिना सर्वांना हवाहवासा वाटत असतो. सगळ्या सणांची धामधूम या महिन्यापासून सुरू होते. त्यात गोवेकर श्रद्धाळू देवभक्त व्रतवैकल्य करणारे. त्यामुळे गोव्यामध्ये खूप भक्तिभावाने श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. गोवा निसर्ग समृद्धीने नटलेला आहे. चोहोबाजूने हिरवीगार झाडे डोलत असतात. पाऊस पडून गेल्यानंतर झाडांची पाने हिरव्यागार पाचूसारखी चमकत असतात. अशा  आल्हाददायक वातावरणात फिरताना मन आनंदून जाते. गोव्यातील प्रत्येक गावातील देवळांमध्ये श्रावणात पूजा पाठ केला जातो. महाप्रसाद केला जातो. असंख्य लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात. प्रत्येक देवळात भजने, आरती यांची रेलचेल सुरू असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण देवळातील भजनांमध्ये आनंदाने सहभागी होत असतात. याच महिन्यात भजन स्पर्धांचेही आयोजन केले जाते आणि भजनी मंडळे खूप उत्साहाने त्यामध्ये भाग घेत असतात. महिला नटून थटून देवळांमध्ये फुगड्यांचा खेळ खेळण्यासाठी एकत्र येतात. गोव्यातील महिलांमध्ये फुगडी खूप प्रसिद्ध आहे

गोव्यामध्ये श्रावणी रविवारला अधिक महत्त्व आहे. यादिवशी सुवासिनी आदित्य पूजन करतात. त्याला आयतार  पूजन असे म्हटले जाते. पठावर सूर्याचे चित्र काढले  जाते. वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून त्याची पूजा केली जाते. श्रावणातील रविवारला गोव्यात विशेष महत्त्व आहे. रविवार हा गोवेकरांसाठी मासे खाण्याचा दिवस, पण श्रावणातले सर्व रविवार महिला उपवास तरी करतात नाहीतर शाकाहारी जेवण जेवतात. रविवारी प्रत्येकाच्या घरी खूप आनंदी वातावरण असते जेवणामध्ये गोडधोड पदार्थांची रेलचेल असते.

गोव्यात नागपंचमीच्या दिवशी बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पातोळे. हळदीच्या पानांमध्ये बनवलेल्या या पातोळ्यांचा घमघमाट प्रत्येक घराघरांतून येत असतो. तांदळाच्या पिठाची उकड काढून ती हळदीच्या पानावर पसरवून त्यात मोदकाचे सारण भरून त्या पानांची उघड काढली जाते. खूप स्वादिष्ट पदार्थ आहे हा. गोव्यात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे.

श्रावणात अजून एका गोष्टीला खूप महत्त्व आहे, ते म्हणजे ब्राह्मणभोजन. या दिवशी भटजींना घरी बोलावून होम हवन केले जाते. देव्हाऱ्यातील नारळ वर्षातून एकदा याच दिवशी बदलला जातो. भटजी स्वतः स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात आणि प्रसाद म्हणून सर्वजण त्याचा लाभ घेतात. या दिवसात पूजेसाठी भटजी मिळणे खूप अवघड असते. असा हा श्रावण महिना गोव्यामध्ये खूप भक्तिभावाने आणि आनंदी वातावरणात साजरा केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com