राज्यात कोरोनाचा फैलाव; दिवसात ८ जणांचा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

रुग्णांच्या मृत्यूचे सरासरी प्रमाण दिवसाला २ एवढे आहे. बुधवारी ३५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील २२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३८३८ एवढे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 

पणजी: राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी आतापर्यंत सर्वाधिक ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य खात्याने दिली. त्‍यामुळे मृतांचा एकूण संख्‍या १२४ झाली आहे. दरम्यान १ ऑगस्टपासून आतापर्यंत ७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूचे सरासरी प्रमाण दिवसाला २ एवढे आहे. बुधवारी ३५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यातील २२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३८३८ एवढे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 

२४ तासांतील बळी
कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झालेल्‍यांत म्हापसा येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा इस्पितळात त्‍यांना मृतावस्थेत आणले होते. मृत्‍यूनंतर त्‍यांची तपासणी केली असता पॉझिटिव्‍ह असल्‍याचे उघड झाले. चिंबल येथील ५२ वर्षीय पुरुष, शिरोडा येथील ७४ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ८१ वर्षीय पुरुष आणि बेती येथील ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाला. एका अनोळखी कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यूही कोविड इस्पितळात झाल्याची माहिती मिळाली. मडगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, आणि ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू मडगावच्या कोविड इस्पितळात झाल्याची माहिती आरोग्‍य सूत्रांकडून मिळाली.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले ४ रुग्ण आहेत. डिचोलीत २६ रुग्ण, साखळीत ११३, पेडणेत १६९, वाळपईत १३४, म्हापशात ११९, पणजीत १९७, बेतकी येथे ७४, कांदोळीत ९७, कोलवाळ येथे १०५, खोर्लीत ११३, चिंबल येथे २२६, पर्वरीत १५८, कुडचडेत ९०, काणकोणात ४१, मडगावात ४९१, वास्कोत ३५१, लोटलीत ६३, मेरशीत ६५, केपेत ८७, शिरोड्यात ६४, धारबांदोड्यात ८६, फोंड्यात २२० आणि नावेलीत ६२ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

आरोग्यमंत्री कोविड निगेटिव्ह
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्वतःची कोविड पडताळणी चाचणी करून घेतली आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहितीही मिळाली. 

मडगावात एकाच दिवशी ११३ पॉझिटिव्‍ह
नावेली: मडगावात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी मडगाव पालिका क्षेत्रात ११३ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. त्यामुळे मडगावमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६३०च्या वर गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा आकडा दिवसाला ४० ते ५० एवढा होता. मात्र, बुधवारी त्‍यात दुप्पटीने वाढ झाली. मडगावात ९५, तर फातोर्डा परिसरात १८ रुग्ण आढळल्‍याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले आहे. मडगावातील उद्योजक विवेक नाईक यांच्या मते मडगावात कुठेही सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याचे दृष्टीस पडत नाही. यावरून संबंधित प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

चर्चिल व त्यांच्या पत्नीवर मणिपालमध्ये उपचार
माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव व त्यांच्या पत्नी फातिमा आलेमाव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांना दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 

चर्चिल व फातिमा आलेमाव यांना मणिपाल इस्पितळात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती आलेमाव यांच्या निकटवर्तींयांनी दिली. आलेमाव यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी केली असून कुटुंबातील सदस्यांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

सचिवालयात कोरोनाचा शिरकाव
सचिवालयात कोविडबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार घातला. सचिवालयात आतापर्यंत १२ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आम्हाला कोरोना झाला तर आमच्या घरच्यांनाही होईल, अशा प्रकारची भीती येथील कर्मचाऱ्यांना वाटत होती. कामावर बहिष्कार टाकलेल्या लोकांनी काही मागण्या केल्या आहेत. योग्य सामाजिक अंतर बाळगण्याची आसनव्यवस्था करावी, शिवाय सचिवालयाचे सॅनिटायझेशन करावे, सर्व कर्मचाऱ्यांना कामाची सक्ती न करता काही दिवस ५० कर्मचाऱ्यांना बोलविण्यात यावे, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्‍या आहेत

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या