गोव्याच्या कुळागरांचे वैभव निसर्गाची गोडी लावणारे विश्व !

Dainik gomantak
बुधवार, 8 जुलै 2020

४५ वर्षापासून बायोगॅसची साथ .. ! 
धनंजय मराठे यांच्या घरात दररोजचे अन्न शिजते. ते बायोगॅस या उर्जेवर. गेली ४५ वर्षे हा बायोगॅस कुटुंबियांना साथ देतो आहे. काजू हंगामात फेणी दारु भट्टीतून टाकाऊ असणारा स्थानिक भाषेतील 'गोडो' हे रसायन या बायोगॅसच्या संचात टाकले जाते. दररोज शेणाची स्लरी गॅस संचात सोडले जाते. मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने या फेणी गोडाचा वापर केल्याने जमीनीत असलेल्या बायोगॅसच्या टाकीतील शेणाच्या स्लरीमध्ये साय धरत नाही. गोड्यातील उष्णतेमुळे स्लरी उकळली जाते. 

वाळपई  : गोवा म्हटल्यावर केवळ समुद्र किनारे, कसिनो एवढेच डोळ्यासमोर पर्यटकांच्या नजरेत उतरलेले आहे. पण गोवा हा ग्रामीण जीवनांने बहरलेला असून गावातील निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. हे आता हळूहळू काही पर्यटकांना अनुभवता येऊ लागले आहे. ग्रामीण भागातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेली गावे, हिरवीगार अशी कुळागरे आज लोकांना साद घालीत आहेत. पर्यटक सोडूनच द्या. मजेशीर गोष्ट म्हणजे गोव्यातील काही लोकांनाही ग्रामीण जीवन कसे आहे. तेथील खानपान कसे असते याची माहीती नाही. 
सत्तरी तालुका कुळागरांनी वेढलेला असा तालुका आहे. कुळागर म्हणजे निसर्गाचे सौंदर्यच जणू असेच एक गाव म्हणजे नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील आंबेडे हे गाव म्हणावे लागेल. या आंबेडे गावात राहणारे धनंजय मराठे व त्यांचे कुटुंब केवळ बागायती कामात रमलेले दिसून येते. त्यांनी बागायतीत गेली तीस वर्षे सातत्याने राबून कुळागराला निसर्गाचे रुप दिले आहे. वाडवडील आंबेडेत वास्तव्यास येऊन पन्नास वर्षे उलटून गेली. वाडवडीलांनी कबाड कष्ट करुन कुळागर उभे केली. त्याचे परंपरागत संवर्धन आजही केले जाते. त्यांच्या कुळागराला भेट देण्यासाठी गोव्यातून तसेच अन्य राज्यातून लोक येत असतात. यावर्षीच्या जानेवारी, फेब्रुवारीत तीन चार वेळा पर्यटकांचा संघ भेट देऊन गेला होता. केवळ समुद्र किनारी मौजमजा करण्यापलीकडे गोव्याची वेगळी अशी ओळख आहे. पण आंबेडे गावातील मराठे यांच्या कुळागरात फिरले की नक्कीच वेगळेपणाची जाणीव होते व तेच पर्यटकांना आकर्षणाचे ठरलेले आहे. 
धनंजय यांच्या कुळागरात सुपारी, केळी, मिरी, नारळ, जायफळ तसेच काजू पीक आहे. विशेष म्हणजे काही काजू झाडांमध्ये घेतलेले हिरवा चारा पीक फायद्याचे ठरले आहे. केळी पिकाच्या सालदाटी, सावरबोंडी, हजारी या जातींना बरीच लोकप्रियता लाभली आहे. सुपारी (पोफळी) पिकाची शिरशी, लोकल जात तसेच विशेष करून मोहीतनगर ही सुपारीची जात अतिशय जास्त सतत बाराही महिने उत्पादन देणारी आहे, असे धनंजय मराठे यांनी सांगितले. 
केळी पिक हे खादाड असल्याने बरेच खाद्य पुरवावे लागते. सप्टेंबर, मार्च महिन्यात खतांचा पुरवठा करावा लागतो. धनंजय मराठे यांनी कुळागराला व्यवसायाबरोबरच कुटुंबच मानले आहे. हेच आपले निसर्गसौंदर्य विश्व आहे. ते दररोज चार पाच वेळा कुळागरात भ्रमंती करून लक्ष ठेवून असतात. 

काजूची 'बाळ्ळी १' पूर्ण हंगाम देते उत्पादन ! 
मराठे यांची काजू बागायत आहे. त्यात वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ७, गावठी अशा जातीची लागवड आहे. त्यात विशेष करुन ' बाळ्ळी १ ' ही जात आहे. ही जात एकदा काजूचा हंगाम सुरू झाला की मे महिन्यापर्यंत पूर्ण हंगाम उत्पादन देते आहे. त्यामुळे बाळ्ळी १ जातीला लोकांनी प्राधान्य दिले पाहिजे असे धनंजय मराठे म्हणाले. 

'मोहीत नगर' बारमाही उत्पादन देणारा सुपारीचा वाण! 
सुपारी पिकाची मोहीत नगर ही जात चांगली असून बारमाही उत्पादन देणारी आहे. त्यासाठी खतांचे बरेच काम करावे लागते. ही जात येथील जमिनीत चांगली तग धरणारी ठरली आहे. तसेच पपई पिकाची 'तैवान ६८६' जातीची लागवड पाच वर्षाअगोदर केली होती. या पपईची रानटी साळ प्राण्याने खाऊन नष्ट केले. त्याचा मोठा फटका बसला होता. 

जोड धंदा म्हणून स्वीकारला दुग्धव्यवसाय ! 
बागायतीत प्रत्येकवेळी खत विकत घणे शक्य नसते. खताची घरीच उपलब्धता व्हावी, यासाठी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मराठे करीत आहेत. त्याकामी त्यांच्या पत्नी सौ. कल्पना मराठे व मुले कु. यश व कु. भुषण मदत करत आहेत. एकूण सात जर्सी गायी आहेत. या शेणाचा वापर कुळागरात पिकांसाठी केला जातो. दुधाची विक्री नगरगाव दुग्ध व्यावसायिक सोसायटीत दररोज सकाळ, संध्याकाळी केली जाते. यातून सरकारी अनुदानाचाही लाभ मिळतो आहे. सुधारित कामधेनू योजनेचा लाभ त्यांनी घेतला आहे. या गुरांसाठी खाद्य म्हणून जुने गोवा येथून आय.सी.ए.आर येथून सी.ओ. ५ या जातीचे बियाणे आणून हिरव्या चाऱ्याची लागवड गतवर्षी केली आहे. या चाऱ्याला लवकर फुलोरा येत नसल्याने अगदी तीन मीटर पर्यंत वाढतो. भरघोस अशी चांगली वाढ होते आहे. फुलोरा येण्याअगोदर हिरव्या चाऱ्याची कापणी करायची असते. कापणीनंतर दीड दोन महिन्यांनी पुन्हा चारा कापणीस तयार होतो. 

४५ वर्षापासून बायोगॅसची साथ .. ! 
धनंजय मराठे यांच्या घरात दररोजचे अन्न शिजते. ते बायोगॅस या उर्जेवर. गेली ४५ वर्षे हा बायोगॅस कुटुंबियांना साथ देतो आहे. काजू हंगामात फेणी दारु भट्टीतून टाकाऊ असणारा स्थानिक भाषेतील 'गोडो' हे रसायन या बायोगॅसच्या संचात टाकले जाते. दररोज शेणाची स्लरी गॅस संचात सोडले जाते. मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने या फेणी गोडाचा वापर केल्याने जमीनीत असलेल्या बायोगॅसच्या टाकीतील शेणाच्या स्लरीमध्ये साय धरत नाही. गोड्यातील उष्णतेमुळे स्लरी उकळली जाते. 

परागीभवनासाठी मधुमक्षिका पालन ! 
शेती, बागायती पिकामध्ये पिकांना फुलोरा येण्यासाठी परागीभवन होणे गरजेचे असते. त्यासाठी मधुमक्षिका ही चांगले काम करीत असते. या बागायती पिकात परागीभवन चांगले व्हावे यासाठी धनंजय यांना मधुमक्षिका पालन केले आहे. शेतकी खात्याच्या आत्मा अंतर्गत पाच मध पेट्या खरेदी केल्या आहेत. त्यातून घरगुती मध तर मिळतोच पण काजू पिकासाठी परागीभवनासाठी मधमाशा उपयुक्त ठरतात.

संबंधित बातम्या