पणजी भाजपमध्ये दुफळी

Split in Panaji BJP
Split in Panaji BJP

पणजी: पणजीत सध्या राजकीय शाब्दिक चिखलफेक होऊ लागली आहे. आमदार बाबूश मोन्सेरात हे भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपची महापालिकेत एकहाती सत्ता निर्माण झाली आहे. परंतु महापौर उदय मडकईकर आणि भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुकंळ्येकर यांच्यात सुरू झालेल्या वाक्‌युद्धातून पक्षाच्या झोळीत काय पडणार हे माहीत नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीचे आडाखे आता नगरसेवक बांधू लागले आहेत. काही नगरसेवकांनी तर यातून पाडापाडीचे राजकारण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

आमदार बाबूश मोन्सेरात हे भाजपमध्ये आल्याचे अनेकांच्या गळी उतरले नाही, परंतु पणजीचा विकास साधायचा झाल्यास सत्ताधारी पक्षात असणे आवश्‍यक असल्याने आणि पणजीकरांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी मोन्सेरात यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मोन्सेरात पणजीचे आमदार झाल्याने भविष्यात काही वर्षे आपणास भाजपची उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव अनेकांना झाली. मोन्सेरात काँग्रेसमध्ये असताना विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी महापौर उदय मडकईकर यांनी तत्कालीन आमदार तथा इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे चेअरमन राहिलेल्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्यावर आरोप केले. स्मार्ट सिटीच्या कामावरही त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. त्याचा फायदा मोन्सेरात यांना निवडणुकीत निश्‍चित झाला. 

मोन्सेरात निवडून आल्यानंतर काही दिवसांतच ते भाजपवासी झाले आणि माजी आमदार कुंकळ्येकर यांनी अधूनमधून महापालिकेच्या कामावर बोट ठेवायला सुरवात केली. महापालिकेच्या कामावर बोट ठेवल्यामुळे महापौर मडकईकर यांनी आयपीएससीडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वयंदिप्ता पाल चौधरी यांची हकालपट्टी झाल्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्‍न उपस्थित केले. चौधरी यांना हटविण्यात आल्याने आपले आरोप खरे ठरले असे मडकईकर ठामपणे सांगतात. आता त्यांनी कुंकळ्येकर यांना समोरासमोर आल्यास आपण स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करून दाखवितो, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत काहीही भूमिका का घेत नाहीत, हे स्पष्ट होत नाही. 

आगामी महापालिका निवडणुकीत आमदार मोन्सेरात सांगतील तोच उमेदवार असेल, या भीतीने सध्याचे नगरसेवकांना (मूळ भाजपचे) आपले तिकीट कापले जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्याशिवाय सध्याचे असलेल्या प्रभाग राखीव होऊ शकतात, अशीही अनेकांना स्वप्नं पडू लागली आहेत. मडकईकर आणि कुंकळ्येकर यांच्यात अनेक महिन्यांपासून शाब्दिक चिखलफेक सुरू आहे. या चिखलफेकीचा नक्की कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार, हे माहीत नसले तरी पणजीकरांचे त्यातून मनोरंजन होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com