चिखली, फातोर्ड्यातील क्रीडा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार: दीपक लोटलीकर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

दोन्हीही प्रकल्पाचा बांधकामास सुरुवात करण्यात आली असून दोन्हीही प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक लोटलीकर यांनी दिली.

सासष्टी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला केंद्रस्थानी ठेऊन दक्षिण गोव्यात क्रीडा प्राधिकरणातर्फे ७० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या पाच प्रकल्पांपैकी चिखली येथील स्क्वॅश कोर्ट आणि फातोर्डा येथील लॉन टेनिसचे बांधकाम लॉकडाऊनमुळे उखडले होते. परंतु, आता दोन्हीही प्रकल्पाचा बांधकामास सुरुवात करण्यात आली असून दोन्हीही प्रकल्प डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक लोटलीकर यांनी दिली. 

चिखली येथील स्क्वॅश कोर्ट आणि फातोर्डा येथील लॉन टेनिस हे प्रलंबित राहिलेले प्रकल्प जून २०२० मध्ये पूर्णत्वास होणार होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका दोन्हीही प्रकल्पाच्या बांधकामास बसला असून आता हे प्रकल्प डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनामुळे गोव्यात होऊ घातलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून 

यासंबंधीही बैठक घेण्यात आहे. पण, त्यापूर्वी हे दोन्हीही प्रकल्प पूर्ण  होणार आहे, असे दीपक लोटलीकर यांनी सांगितले.  फातोर्डा येथे उभारण्यात येणाऱ्या लॉन टेनिसवर सुरुवातीला तीन कोर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, राष्ट्रीय क्रीडा समितीने आणखी एक कोर्टची मागणी केल्यामुळे तिथे चार कोर्टचा लॉन टेनिस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन कोर्ट उभारण्यात येणार असल्यामुळे यावर तीन कोटी रुपये खर्च होणार होते, परंतु हा आकडा आता सुमारे साडेतीन कोटी रुपयांवर पोहचला असून प्रकल्प उभारण्यासाठी वेळही जास्त लागलेली आहे, 

अशी माहिती दीपक लोटलीकर यांनी दिली. चिखली येथील स्क्वॅश कोर्ट या प्रकल्पाच्या बांधकामास कंत्राटदाराचा बाजूने विलंब होत असल्याने स्क्वॅश कोर्टचे बांधकाम संथगतीने चाललेले होते तर आता लॉकडाऊनचा फटका कोर्टच्या बांधकामास बसलेला आहे. परंतु, डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

क्रीडा प्राधिकरणातर्फे या पाचही प्रकल्पांवर सुमारे ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून स्क्वॅश कोर्टसाठी ६ कोटी, नावेली इनडोअर स्टेडियमसाठी ४३ कोटी, फोंडा इनडोअर क्रीडा संकुलासाठी १० कोटी मल्टिपर्पज सभागृहासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पाच प्रकल्पापैकी स्क्वॅश कोर्ट आणि लॉन टेनिस वगळल्यास इतर प्रकल्पाचे बांधकाम पूर्णत्वास आलेले आहे, असे दीपक लोटलीकर यांनी सांगितले. नावेली इंडोर स्टेडियमचे काम पूर्ण झाले असून यात हँडबॉल, खो-खो आणि कबड्डी आदी खेळ खेळविण्यात येणार, 

मल्टीपर्पज सभागृहात सेपक टेकरो आणि उशु, फोंडा इंडोर स्पोट्स संकुलात थाइक्वांडो आणि जुडो हे खेळ आखण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे टकळण्यात आली आहे. पण. हे सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या