२१ मे पासून दहावीची परीक्षा

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

दहावीची परीक्षा २१ मे रोजी सुरु होऊन १ जून रोजी मुख्य विषयांची परीक्षा संपणार आहे

पणजी

दहावीची परीक्षा येत्या २१ मे पासून सुरु होणार आहे. ही परीक्षा सरकारने घ्यावी यासाठी विद्यार्थी व पालकांचा मोठा रेटा होता. त्यांना गोमन्तकने आपले म्हणणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे १७ मे नंतर दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करू अशी भूमिका घेणाऱ्या सरकारला केंद्रीय गृह मंत्रालयाची या परीक्षेसाठी पूर्वपरवानी घेत सरकारने गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्यास सांगितले. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता बैठक घेतली होती.
मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीची परीक्षा २१ मे रोजी सुरु होऊन १ जून रोजी मुख्य विषयांची परीक्षा संपणार आहे. त्यानंतर ६ जूनपर्यंत विशेष विद्यार्थ्यांची परीक्षा चालणार आहे. मंडळ उद्या (ता.७) दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. बारावीचे शिल्लक राहिलेले पेपर पूर्वीच्याच क्रमाने २०, २१ व २२ मे रोजी घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा त्या त्या विद्यालयात घेतली जाणार नसून ती पूर्वी ठरवल्यानुसार त्या त्या केंद्रावरच घेतली जाणार आहे. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना समाज अंतर पाळावे लागणार असल्याने काही ठिकाणी उपकेंद्रे वाढवली जाऊ शकतात.
याआधी सरकारने १० दिवस आधी वेळापत्रक जाहीर करू असे सांगितले होते. त्यानुसार आता १३ दिवस अगोदर वेळापत्रक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही परीक्षा कधी होणार अशी विचारणा सरकारला राज्यभरातून होत होती. पालक, विद्यार्थी सारेच परीक्षा कधी होणार याच्या विचाराने टांगणीला लागले होते. सरकारने १७ मे म्हणजे टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्याच्या समाप्तीनंतर दहावीची परीक्षा जाहीर केली असती तर ती थेटजणे जूनमध्येच सुरु झाली असती. मात्र पावसाळा सुरु होण्याआधी परीक्षा घेतली जावी यासाठी सरकारी पातळीवर थोडी घाई करण्यात आली आहे.

देशभरात केवळ गोव्यातील परीक्षा राहिल्या होत्या. ईशान्येकडील राज्यांत काही ठिकाणी परीक्षा होणे बाकी होत्या. त्यामुळे देशभरात दहावीची परीक्षा कधी अशी विचारणा तेथील सरकारला होत नव्हती. केवळ आमचाच प्रश्न असल्याने स्थानिक पातळीवर ही परीक्षा घेण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची पूर्वपरवानगी घेण्यात आली आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या