दहावीची परीक्षा झालीच पाहिजे ः पार्सेकर

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

तांत्रिक मुद्दे पुढे करून विद्यार्थ्याच्या जीवनाकडे खेळू नये. विद्यार्थ्यांच्या जीवनाकडे खेळणे म्हणजे त्याच्या भावी जीवनाकडे खेळणे होय हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

पणजी

दहावीची परीक्षा ही झालीच पाहिजे. त्यासाठी भाजप पक्ष पूर्ण ताकदीनिशी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागे उभा आहे. सरकारनेही सर्वतोपरी मदत मंडळाला परीक्षा घेण्यासाठी करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, शैक्षणिक क्षेत्राशी कुठेच संबंध नसलेले, ज्या व्यक्तीचे शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात आलेले नाही अशी व्यक्ती उच्च न्यायालयात जाते आणि काही राजकारणी त्याला खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. दिगंबर कामत हे माजी मुख्यमंत्री आहेत. पाच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षणाला किती महत्त्व दिले आहे हे सर्वांनी पाहिले आहे. शिक्षण खात्याकडे ते कसे पाहत हे जरा भूतकाळात डोकावून पहा. पण परीक्षाच नको हे अत्यंत अयोग्य आहे. आम्ही सगळे नववीपर्यंत सामूहिक उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या बाबतीत हे घडता कामा नये. गेले दोन महिने विद्यार्थी दडपणाखाली आहेत. गेले पंधरवडाभर, आठवडाभर तारखा जाहीर झाल्याने ते अभ्यासाच्या उजळणी करत आहेत. त्यामुळे ठरल्यानुसार त्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत.
ते म्हणाले, गेले काही दिवस दहावी परीक्षेसंदर्भात घोळ घालणे काहीजण जाणीवपूर्वक घालत आहेत असे लक्षात आले आहे. दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्याच्या जीवनात लक्षणीय असते. दहावीच्या निकालावरून विद्यार्थ्याची पुढील दिशा ठरली जाते. पुढील वेगवेगळ्या विद्याशाखांतील प्रवेश हा बहुतांशपणे दहावीच्या निकालावरच अवलंबून असतो. त्यामुळे दहावीच्या परीक्षेच्याबाबतीत कोणी राजकारण करू नये असे आम्हाला वाटते. सरकारवर टीका करायची झाली तर वेगवेगळे मार्ग आहेत खूप विषय आहेत, विद्यार्थ्यांना वेठीस धरून ही गोष्ट केली जाऊ नये. जे विद्यार्थी मार्चमध्ये परीक्षा होणार म्हणून तयारीत होते ते विद्यार्थी पूर्ण मार्च गेला, एप्रिल सरला, मे निम्मा झाला तरी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. गेला आठवडाभर गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तयारीत आहे. महाराष्ट्रातील व कर्नाटकातील पाच पाच विद्यार्थ्यांसाठीही उपकेंद्रे सुरू केली आहेत. परीक्षेसाठी सर्वांची नियुक्तीही झाली आहे. परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. अशा वेळी काळजी घ्यावी, मंडळाला सरकारने मदत करावी. मंडळ ही स्वायत्त संस्था आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे का. केंद्रीय गृह मंत्रालयाची सूचना आहे का असे प्रश्न अकारण उपस्थित केले जात आहेत. विद्यापीठे व मंडळाने परीक्षा घेण्यास कोणाच्या परवानगीची गरज नाही. शिक्षणात राजकारण येऊ नये याची काळजी घेतली. विद्यार्थी मानसिकदृष्ट्या काय अवस्था झाली आहे हे शिक्षक म्हणून मी समजू शकतो. माझ्या शाळेत ८० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सारे पालक व विद्यार्थी अस्वस्थ आहेत. पक्ष म्हणून मंडळाच्या मागे आम्ही पूर्ण ताकदीने राहणार आहे. सरकारची ताकद मंडळाच्या मागे उभी करावी अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली आहे. तांत्रिक मुद्दे पुढे करून विद्यार्थ्याच्या जीवनाकडे खेळू नये. विद्यार्थ्यांच्या जीवनाकडे खेळणे म्हणजे त्याच्या भावी जीवनाकडे खेळणे होय हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी मंत्री रमेश तवडकर, सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते.

जबाबदारी घेणार का?
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारणा केली, दहावीच्या परीक्षेवेळी कोणतीही नको असलेली घटना घडली तर त्याची जबाबदारी भाजप घेणार आहे का? आपण शिक्षणाच्याबाबतीत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी पुढे ८ वर्षे भाजप सरकार करत आहे. आपण घेतलेली भूमिका ही सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतली आहे आणि परीक्षाला पर्याय शोधा अशी विनंती केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे

संबंधित बातम्या