दहावीची परीक्षा सुरु

ssc exam
ssc exam

पणजी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दहावीच्या परीक्षेसंदर्भात अनिश्‍चितता निर्माण झाली होती, त्यावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करताना राज्य सरकारला परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याने त्यावर पडदा पडला. त्यामुळे ही परीक्षा आजपासून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाली आहे. या परीक्षेवरून विद्यार्थी व पालकांवरील असलेला मानसिक तणाव व संभ्रम दूर होऊन दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही परीक्षा घेण्यास परवानगी देत परीक्षा तहकूब किंवा स्थगित ठेवण्यासाठीच्या याचिका काल निकालात काढल्या.
केंद्र सरकारतर्फे गृह मंत्रालयाने गोवा सरकारला दहावीची परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याचे पत्र आज गोवा खंडपीठासमोर सादर केले. गृह मंत्रालयाने घेतलेला निर्णय गोवा खंडपीठाने स्वीकारला. १५ मे २०२० रोजी गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशात परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सरकारतर्फे ज्या उपाययोजना, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करण्याची माहिती देण्यात आली होती, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. परीक्षा केंद्रातील सर्व साहित्य तसेच शौचालये व परीक्षा खोल्या सॅनिटायझर्सने स्वच्छ करण्यात येणार आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

परीक्षा केंद्राच्या ठिकाणची व्यवस्था
- प्रत्येक परीक्षा उपकेंद्रावर थर्मल स्क्रिनिंग
- वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रणासाठी पोलिस तैनात
- सॅनिटायझर्सने परीक्षा केंद्रांची करणार स्वच्छता
- विद्यार्थ्यांना सॅनिटायझर्सने हात धुण्याची सुविधा
- आरोग्य व सुरक्षिततेसाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध
- सामाजिक अंतर ठेवून परीक्षार्थींची आसनव्यवस्था
- आरोग्य सुविधांची केंद्रावर उपलब्धता
- प्रत्येक उपकेंद्रावर मदतीसाठी स्वयंसेवक तैनात

जनहिताच्या दृष्टीने परीक्षेचा निर्णय
दहावीच्या परीक्षेवरून विद्यार्थी व पालक मानसिक तणावाखाली होते. जनहिताच्या दृष्टीने विचार करूनच सरकारने ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याचे राजकारण व्हायला नको होते. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्यादृष्टीने महत्त्‍वाची होती. उच्च न्यायालयाने ही परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याने विरोधकांनी परीक्षेवरून राजकारण करणे, आता सोडून द्यावे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे सरकार स्वागत करत आहे. या परीक्षेसाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना घेण्यासंदर्भात दिलेली माहितीबाबत मान्यता देऊन परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेबाबत परीक्षा केंद्रावर सर्व ते उपाय घेण्यात आले आहेत. या परीक्षेस सरकार सज्ज असल्‍याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

१९,६८० विद्यार्थी देत आहेत परीक्षा
दहावीची परीक्षेला आज २१ मे पासून सुरू झाली असून १९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यामध्ये ९ हजार ७९० मुलगे तर ९ हजार ८९० मुली आहेत. ही परीक्षा २९ केंद्रावर होत असून ती ६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक परीक्षा खोलीमध्ये ८ ते १२ विद्यार्थ्यांची परीक्षेची सोय करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजता परीक्षेस सुरवात झाली आहे. अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर राहण्याची सक्ती करण्यात आली होती तरीही सकाळी लवकरच पालक व विद्यार्थी परीक्षा केंद्र परीसरात पोचले होते. महाराष्ट्रामध्ये चार, तर कर्नाटकमध्ये दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे.

सरकारने काय म्‍हटले प्रतिज्ञापत्रात...
पावसाळा सुरू झाल्यावर ‘कोविड - १९’च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व ती तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आताच ही परीक्षा घेणे सोयीस्‍कर आहे, असे पत्रात नमूद केले होते. या पत्राला गृह मंत्रालयातर्फे आज २० रोजी उत्तर पाठवून टाळेबंदी मार्गदर्शक सूचनांच्या आदेशामधून ही परीक्षा घेण्यास राज्य सरकारला मुभा देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले होते. गृह मंत्रालयाने सरकारला दिलेल्या परवानगीचे पत्र गोवा खंडपीठासमोर सादर केले गेले.

परवानगीचे दाखविले पत्र
गृह मंत्रालयाने टाळेबंदी मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा बंद ठेवल्याने परीक्षेला प्रतिबंध, असा अर्थ प्रथमदर्शनी त्यातून निघतो. त्यामुळेच राज्य सरकारला परीक्षा घेण्यासाठी परवानगीसाठीचे पत्र पाठवले होते, हे यावरून दिसून येते. जनहिताच्या दृष्टीने गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सुनावणीवेळी सांगण्यात आले. त्यामुळे दहावी परीक्षा घेण्यासंदर्भातील स्पष्टीकरण गृह मंत्रालयाने केल्याने परीक्षा घेण्यास हरकत नाही, असे खंडपीठाने आदेशात निरीक्षण केले आहे.
गोवा सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम तर केंद्र सरकारतर्फे सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी बाजू मांडली. याचिकादारांतर्फे ॲड. दिनीझ व ॲड. रायन मिनेझिस यांनी तर हस्तक्षेप अर्जातर्फे ॲड. दत्तप्रसाद लवंदे व ॲड. शिवन देसाई यांनी सरकारला पाठिंबा देणारी बाजू मांडली.
राज्यातील दहावीची परीक्षा टाळेबंदीमुळे घेणे शक्य नसल्याने पुढे ढकलण्यात आली होती. टाळेबंदी मार्गदर्शक सूचनांच्या आदेशानुसार परीक्षा घ्यावी किंवा नाही, याचा उल्लेख त्यामध्ये नव्हता. त्यामुळे गोवा सरकारने परीक्षा घेण्यास बंदी नाही, असा अर्थ काढत परीक्षा निश्‍चित केली होती. सरकारने दिलेल्या आश्‍वासनानुसार ६ मे रोजी दहावीची परीक्षा २१ पासून सुरू होणार असल्याचे दहा दिवस आधी घोषित केले होते. मात्र, प्रश्‍न जेव्हा गोवा खंडपीठासमोर येऊन स्पष्टीकरण गृह मंत्रालयाकडे मागण्यात आले, तेव्हा ही परीक्षा आता २१ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा घेण्यास गृह मंत्रालयाने परवानगी द्यावी, असे तातडीने पत्र गोवा सरकारने काल पाठवले होते.

महाराष्‍ट्रात चार,
कर्नाटकात दोन परीक्षा केंद्रे

महाराष्ट्र व कर्नाटकच्या हद्दीवरील सुमारे २०० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र महाराष्ट्र व कर्नाटकमध्येच निश्‍चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात चार, तर कर्नाटकात दोन परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रावरही पर्यवेक्षक हे तेथील भागातील निवृत्त शिक्षक किंवा केंद्राच्या शाळेत असलेल्या शिक्षिकांची मदत घेतली जात आहे. या ठिकाणीही ‘कोविड - १९’ साठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केली जाणार आहे. राज्यातील परीक्षा केंद्रावर आवश्‍यक ती सुरक्षितता घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठीही स्वयंसेवक केंद्रावर नेमण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर टाळेबंदीची मुदत वाढवताना १७ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला होता. मात्र, शाळा व महाविद्यालये बंद ठेवताना त्यातून परीक्षा घेण्यास परवानगी आहे की नाही, याबाबत स्पष्टीकरण नव्हते. गोवा सरकारने या मार्गदर्शक सूचनांमधून परीक्षा घेण्यास हरकत नाही, असे गृहित धरून दहावीच्या परीक्षा २१ पासून घेण्याचा निर्णय घेतला होता. या सूचनांचे उल्लंघन केल्याचे व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही परीक्षा पुढे ढकलण्याचे वा स्थगिती देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादारांनी केली होती. गोवा खंडपीठाने गेल्या १५ मे २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात ही स्थगिती नाकारून येत्या ४ जूनला सुनावणी ठेवली होती. मात्र, आज अंतरिम अर्जाबरोबर या याचिकांवरही सुनावणी घेण्यात आली. ही परीक्षा व्हावी यासाठी तिघा पालकांनी हस्तक्षेप अर्ज सादर केला होता.
दरम्यान, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ चालल्याने याचिकादारांनी अंतरिम अर्ज सादर करून खंडपीठासमोर सद्यस्थितीची माहिती देऊन ही परीक्षा घेण्यास परवानगी दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. टाळेबंदी मार्गदर्शक सूचना १७ मे २०२० रोजी केंद्र सरकारने जारी केल्या, त्यामध्ये शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे शाळा खुल्या करून या परीक्षा घेता येतात की नाही, याबाबत स्पष्टीकरण नाही. शाळा बंदीचा आदेश असल्याने या परीक्षा सरकारने घेतल्यास मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होते. मात्र, या सूचनांमध्ये परीक्षा घेऊ नये असाही उल्लेख नाही. त्यामुळे गोवा खंडपीठाने तातडीने गृह मंत्रालयाला प्रतिवादी करून २४ तासांत त्यांना स्पष्टीकरणाची भूमिका मांडण्यास सांगण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com