सांताक्रुझ टोळीयुद्धप्रकरणी २२ जणांना अटक 

jaspal
jaspal

पणजी

सांताक्रुझ येथील टोळीयुद्धप्रकरणी आतापर्यंत जुने गोवे पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. एका तरुणीच्या प्रकरणावरून ही टोळीयुद्धाची घटना घडली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. तसेच हल्ला केलेल्या टोळीतील मुख्य सूत्रधार फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. आणखी काहींना अटक होण्याची शक्यता नाकरता येत नाही, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिली. 
मुख्यमंत्र्यांनी आज पोलिस मुख्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर सांताक्रुझ टोळीयुद्धप्रकरणी अधिक माहिती देताना सिंग म्हणाले की, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून घडला असला तरी त्यामागे एक तरुणी आहे, असे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून लहानसहान घटना घडत होत्या. ज्या रात्री इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला झाला त्यामध्ये हल्लेखोरांच्या टोळीतीलच सोनू यादव याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. हा हल्ला होण्यापूर्वी एका टोळीची रात्रीची पार्टी सुरू होती. त्याचवेळी मद्याच्या नशेत असलेल्या टोळीतील तरुणांनी बेपारी याच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा बेत आखला व रात्री तीन ते सव्वातीनच्या सुमारास तलवारी, चॉपर तसेच पिस्तुल व रिव्हॉल्वर घेऊन हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेकजण सामील झाले होते. त्यामध्ये अल्पवयीनांचाही समावेश होता. कायद्यानुसार अल्पवयीन हे अज्ञान असल्याने त्यांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये अटक होत नाही त्याचा फायदा टोळीचा सूत्रधार घेत असतो व या प्रकरणातही असेच काहीसे घडले आहे. त्यामुळे अल्पवयीनांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या बैठकीत सर्व पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांना त्यांच्या क्षेत्रातील गुन्ह्याकडे आकर्षित होणाऱ्या तसेच गुन्हेगारीच्या टोळीमध्ये समावेश असलेल्यांचा शोध घेऊन वेळीच त्यांना अद्दल घडविण्याच्या सूचना केल्या आहेत. अल्पवयीन 
गुन्हेगारीकडे वळत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अशा बालगुन्हेगारांच्या पालकांना बोलावून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. हे बालगुन्हेगार अधिक तर शाळा अर्ध्यावरच सोडलेले किंवा नापास झालेले असतात. अट्टल गुन्हेगारांची जीवनशैली पाहून तसेच कोणतेही श्रम न करता गुंडगिरी करून पैसा कमावण्याकडे ते आकर्षित होऊन ते टोळीमध्ये ओढले जातात. ही प्रकरणे राज्यात वाढत आहेत. अतिसंवेदनशील व दहशत असलेल्या सांताक्रुझमध्ये नवे गुन्हेगार तयार होत आहेत. प्रत्येक पोलिस स्थानकाच्या क्षेत्रातील अट्टल तसेच नव्या गुन्हेगारांची यादी व माहिती जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
जेव्हा बालगुन्हेगारांची चौकशी केली जाते, तेव्हा पोलिस हे गणवेषात नसतील याची काळजी घेण्यात येत आहे. जर बालगुन्हेगार हे शाळेत जाणारे असल्यास त्यांच्या पालकांशी तसेच शिक्षकांशीही चर्चा केली जाईल. त्यामुळे त्यांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रात्रीचा कर्फ्यू लागू असून तो रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत आहे. आवश्‍यकता भासल्यास ही गस्त वाढविली जाईल, असे सिंग यांनी सांगितले. 

goa goa goa 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com