St. Francis Xavier : गोव्याचे ख्रिस्तीकरण आणि संत फ्रान्सिस झेवियर

सगळ्या गोष्टींचा आढावा घेता फ्रान्सिस झेवियर यांना गोंयचो सायब म्हणणे एकदम चुकीचे आहे. ते एक अतिशय कडवे, कर्मठ व कट्टर ख्रिस्ती पंथगुरू होते.
St. Francis Xavier
St. Francis XavierDainik Gomantak

St. Francis Xavier : गोव्याच्या इतिहासातील एक कुप्रसिद्ध घटना, इन्क्विझिशन व त्याच्यावर एलन माशादो (प्रभू) यांनी लिहिलेल्या पुस्तकात लेखक संत फ्रान्सिस झेवियर यांचा उल्लेख करतात आणि लिहितात की, गोव्याच्या एकूण एक ख्रिस्तीकरण व इन्क्विझिशनमध्ये त्यांची भूमिका एकदम नगण्य होती. त्यांनी 1546 साली पोर्तुगाली राजाला फक्त एक पत्र लिहून इन्क्विझिशन पाठवण्यासाठी विनंती केली होती. ते नंतर 1552 मध्ये निधन पावले तर इन्क्विझिशन 1560 साली चालू झाले. त्यामुळे, या क्रूर घटनेशी त्यांचा काहीही संबंध किंवा सहभाग नव्हता, असे लेखक सिद्ध करतात.

तरीसुद्धा आज एका बाजूला हिंदुत्ववादी लोक फ्रान्सिस झेवियर यांन इन्क्विझिशनचा मुख्य म्होरक्या व क्रूरकर्मा म्हणून निषेध करतात, तर उलट सगळे ख्रिश्चन लोक त्यांना ‘गोंयचो सायब’ या आदरणीय नावाने संबोधतात व त्यांचा अतिशय सन्मान करतात. याबाबत हल्ली एक वाद उफाळून आला होता. एका जहाल हिंदू संघटनेने तो वाद उकरून काढला होता की, फ्रान्सिस झेवियर यांना गोंयचो सायब नावाने उल्लेखले जाऊ नये.

तसे स्पेनमध्ये जन्मलेल्या फ्रान्सिस झेवियर यांनी ख्रिश्चन पंथाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्यात अत्यंत कष्ट काढले. एक उमराव घराण्यात जन्माला येऊनसुद्धा त्यांनी आपले आयुष्य पंथप्रचाराला पूर्ण वाहून घेतले व समर्पित केले. ते एक अतिशय कट्टर व कर्मठ ख्रिस्ती पंथप्रसारक होते. त्यांनी इतरांबरोबर जेजूईट या ख्रिश्चन संप्रदायाची स्थापना केली. त्यांच्याएवढा निष्ठावान, समर्पित व यशस्वी ख्रिस्ती पंथप्रसारक दुसरा झालाच नाही, असे म्हणतात.

त्यांचे निधन वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी शांगच्यान या चिनी बेटावर झाले व तिथेच त्यांचे दफन करण्यात आले. पण त्यांचे शव उकरून काढून मालाका इथे पुरण्यात आले. ते परत उकरून काढून गोव्यात आणून त्याचे ममीकरण करून बासलिका बॉम जिझस या जुन्या गोव्याच्या मुख्य चर्चमध्ये ठेवले गेले व आजतागायत आहे. ज्या त्यांचा उजव्या हाताने ते आशीर्वाद व दीक्षा देत, तो कापून रोम येथे प्रदर्शित करण्यात आलेला आहे.

त्यांच्या आयुष्यात त्यांनी पुष्कळ चमत्कार केले असल्याचे नमूद झालेले आहे. विकिपीडिया वाचल्यास त्यांच्या नावावर जवळपास बत्तीस चमत्कार आहेत. संताच्या नावावर अनेक चमत्कार लागलेले असतात. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली व रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले, असे म्हणतात. खरेखोटे देवच जाणे. पण ख्रिश्चन पंथात असल्या चमत्कारांना पुष्कळ महत्त्व आहे व मरणोत्तर त्यांच्या नावावर कमीत कमी दोन चमत्कार असल्याशिवाय त्यांना संतपद बहाल करता येत नाही. अशा या फ्रान्सिस झेवियर यांना संतपद मरणोत्तर 1622 साली म्हणजे जवळपास सत्तर वर्षांनी बहाल करण्यात आले.

त्यांच्या चमत्काराच्या अनेक आख्यायिका आहेत. त्यांतील मुख्य आख्यायिका ही संभाजी महाराजांच्या गोव्यावरील आक्रमणाच्या वेळची आहे. तो किस्सा त्यांचा एक महान चमत्कार म्हणून नेहमी घोटवला जात असतो.

St. Francis Xavier
Portuguese Era Goa : अठराव्या शतकातील नव्या काबिजादीतील राजकारण

आख्यायिका अशी आहे की, जेव्हा संभाजीराजेंनी गोव्यावर आक्रमण केले व फिरंगी सेनेला धूळ चारत ते जेव्हा मांडवी नदीच्या किनाऱ्यावर येऊन शेवटच्या हल्ल्याला सज्ज झाले, तेव्हा पोर्तुगीज अंमलदाराने आपला राजदंड म्हणे फ्रान्सिस झेवियर यांच्या मृतदेहाच्या हातात दिला व प्रार्थना करून करुणा भाकली. तेव्हा म्हणे एक अजब चमत्कार घडला व औरंगजेबाच्या मोगल सेनेने गोव्याच्या दिशेने कूच केल्याचा संदेश ताबडतोब संभाजी महाराजांना आला व सगळी मोहीम अर्धवट सोडून, गोवा पादाक्रांत न करता त्यांना परत फिरावे लागले व गोवा वाचला.

या बाबतीत खरा इतिहास असा आहे की, एक फिरंगी बाई दॉना ज्युलियाना डायस डा कॉस्ता तेव्हा औरंगझेबाच्या राणीमहालात कामाला होती. ही बाई एक पोर्तुगीज व्यापाऱ्याला भारतीय बायकोकडून झालेली मुलगी. तिला शाही राजकुमारांची शिक्षिका नेमण्यात आली होती. त्यामुळे औरंगजेब कट्टर मुसलमान असूनसुद्धा तिला एकदम मान देत असे व तिच्या पोर्तुगीज व ख्रिश्चन लोकांसंबंधित सगळ्या विनंत्या पण मान्य करीत असे.

संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केल्याची बातमी तिच्यापर्यंत पोचवण्यात आली. तिने शेवटी औरंगजेबाला साकडे घालून राजकुमार बहाद्दूर शाह याच्या नेतृत्वाखाली दख्खनस्थित मोगल सैन्य गोव्याच्या दिशेने रवाना करायला भाग पाडले. याबाबतचा सगळा तपशील लुईस दे आसिस कुरिया यांनी गोवा इतिहासावर लिहिलेल्या एका पुस्तकात पूर्ण उपलब्ध आहे. ही घटना घडली नसती तर गोव्याचा पूर्ण इतिहासच बदलून गेला असता यात शंका नाही.

वरच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेता फ्रान्सिस झेवियर यांना गोंयचो सायब म्हणणे एकदम चुकीचे आहे. ते एक अतिशय कडवे, कर्मठ व कट्टर ख्रिस्ती पंथगुरू होते. त्यांनी आपल्या हयातीत गोव्यात व इतरत्र फक्त ख्रिस्ती पंथासाठी काम केले. गोव्यात त्यांचे कार्य अनायासे हिंदूविरोधी होते. चमत्काराची महती असल्याकारणाने काही हिंदू लोक पण त्यांना मानतात व चर्चला भेट देतात. पण, त्यामुळे फ्रान्सिस झेवियर ख्रिस्ती लोकांसाठी कितीही मोठे संत किंवा सायब ठरो, आजच्या मोठ्या प्रमाणात हिंदू बहुसंख्य असलेल्या पूर्ण गोव्याचे साहेब ते कधीच होऊ शकत नाहीत.

-प्रयेश नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com