कोलवाळ कारागृहातील 'त्यांनाही' कोरोनाची लागण; त्यामुळे 'यांच्यावर' आली उपासमारीची वेळ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

कोरोनाबाधित कैदी सापडल्यापासून कारागृह प्रशासनाचे अधिकारी कारागृहात आले तरी ते आपल्या कार्यालयातच भीतीने बसून असतात. कारागृहातील कैद्यांच्या समस्या वा पर्यायी व्यवस्था याची दखलही घेत नाहीत.

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कोरोनाबाधित झालेल्या कैद्यांपैकी अकाहीजण तेथील स्वयंपाकी होते. मात्र, त्यांनाच अलगीकरण करण्यात आल्याने मोठी पंचाईत झाली आहे. कैद्यांसाठी जेवण करणाऱ्यांपैकी तिघेजण कोरोनाबाधित झाल्याने कैद्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे काही कैद्यांनी कारागृह प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. हे उपोषण उद्यापासूनही होण्याची शक्यता आहे.

सध्या कारागृहातील ३३ कच्चे कैदी व ८ तुरुंग रक्षक कोरोनाबाधित सापडले आहेत. या कैद्यांचे अलगीकरण करण्यात आले असले, तरी संसर्ग रोखण्यासाठी काहीच उपाययोजना तुरुंग प्रशासनाकडून केलेल्या नाहीत. कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यावर तसेच कारागृहात कैद्यांची संख्या अधिक असल्याने मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अशक्य होते. त्यामुळे दिल्लीतील व फरारी होणार नाहीत अशा कैद्यांना ठराविक काळासाठी जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र, गोमंतकीय कैदी ज्यांची कुटुंबे गोव्यात आहेत त्यांना ही मोकळीक दिली गेली नाही. कारागृहात कोरोनाग्रस्त कैद्यापासून धोका असल्याने त्यांना बाहेर सोडण्यात यावेत, अशी मागणी गोमंतकीय कैद्यांनी केली आहे. 

दरम्यान, कारागृहातील स्वयंपाक हे कैदीच करतात. मात्र, त्यातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याने स्वयंपाक करण्यासाठीची कैद्यांची संख्या कमी झाली आहे. चपात्या करणारा कैदी कोरोनाग्रस्त असल्याने त्याला पर्याय कोणीच नाही. त्यामुळे कैद्यांना जेवणात चपाती दिली जात नाही. काही कैद्यांना उपाशी राहण्याची पाळी आली आहे.

कोरोनाबाधित कैदी सापडल्यापासून कारागृह प्रशासनाचे अधिकारी कारागृहात आले तरी ते आपल्या कार्यालयातच भीतीने बसून असतात. कारागृहातील कैद्यांच्या समस्या वा पर्यायी व्यवस्था याची दखलही घेत नाहीत. तुरुंग सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर हेच सध्या कारागृहाचे सर्वेसर्वा असल्यासारखे वागत असून ते कैद्यांच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचण्यास देत नाहीत.

कारागृहातील गणेशोत्सव रद्द
कोलवाळ कारागृहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, कोविड - १९ पार्श्‍वभूमीवर तसेच कोरोनाची लागण झालेले कैदी असल्याने यावर्षी हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा उत्सव होणार नसल्याने दरवर्षी कैद्यांमध्ये असलेला उत्साह मावळला आहे. या उत्सवात अनेक कैदी आपापल्या पद्धतीने गणेशमूर्तीच्या सभोवती सुशोभिकरण करतात. कारागृहात विविध धर्माचे कैदी असले तरी या उत्सवानिमित्त सर्वजण एकत्र येऊन त्यामध्ये सहभागी होत असतात.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या