खबरदारीसह दहावी, बारावीचे वर्ग सुरू करा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

दहावी आणि बारावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याचा ताबा असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतल्याने या निर्णयाचे बहुतांश खाण अवलंबितांकडून स्वागत करण्यात येत आहे.

पाळी :  दहावी आणि बारावी वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याचा ताबा असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतल्याने या निर्णयाचे बहुतांश खाण अवलंबितांकडून स्वागत करण्यात येत आहे. दहावी आणि बारावी वर्ग सुरू करताना संबंधित शाळा व्यवस्थापनांना योग्य ती खबरदारी घेण्याबरोबरच विशेषतः खाण भागातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाणे खाण कंपन्यांकडून वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा आणि खाण भागातील विद्यार्थी व पालकांना सोयीस्कर ठरेल, अशी कृती करावी, अशी मागणीही खाण अवलंबितांनी केली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील विविध उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत गेल्याने आता बहुतांश व्यवहार सुरू झाले आहेत. कोरोनामुळे इतर क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. वास्तविक गेल्या जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार होते, मात्र शाळा, विद्यालये सुरू न करता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले. कोरोनामुळे शाळा, विद्यालये सुरू करणे शक्‍य नव्हते, आणि ती सुरू करणेही धोक्‍याचे होते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

ऑनलाईन पद्धतीमुळे विशेषतः शहरी भागातील लोकांना लाभ झाला, मात्र ग्रामीण भागातील आणि खाण व दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गोवा हा प्रदेश डोंगरदऱ्यांचा असल्याने ऑनलाईन सेवेवर विपरीत परिणाम झाला. त्यातच "रेंज'' मिळत नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी आल्या. ऑनलाईन शिक्षण घेताना आणि देतानाही विद्यार्थी व पालकांना अडचणीचे झाले. त्यामुळे विद्यार्थी नेमके काय शिकले आणि पालकांनी नेमके काय शिकवले हा मुद्दाही उपस्थित झाला होता. 

आता कोरोनाची महामारी काही अंशी कमी झाली आहे. सर्व उद्योग व्यवसाय आणि व्यवहार बिनधास्तपणे सुरू आहेत, त्यामुळेच शिक्षण खात्याने किमान दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी कार्यवाही केली आहे. त्यामुळे येत्या २१ नोव्हेंबरला हे दोन्ही वर्ग सुरू होणार आहेत, मात्र सक्ती नसेल, असे सरकारने स्पष्ट केल्याने पालकांनाही दिलासा मिळाला आहे. 

विद्यार्थ्यांच्या समस्यांत वाढ

राज्यातील खनिज खाणी दुसऱ्यांदा बंद झाल्यानंतर खाण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. खाणी बंद पडल्यानंतर खाण कंपन्यांनी काही तुटपुंज्या सुविधा सुरू केल्या होत्या, त्या लगेच बंद केल्या. काही खाण कंपन्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजात ने आण करण्यासाठी बसगाड्या तसेच जीपगाड्यांची सोय केली होती. मात्र खाणी बंद झाल्याचे निमित्त पुढे करून या खाण कंपन्यांनी ही सुविधाही बंद केली. दरवर्षी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना काही खाण कंपन्या गणवेष तसेच शालेय साहित्य मोफत पुरवायचे, तेही बंद करण्यात आले. त्यामुळे रोजगार नाही आणि मुलांच्या शिक्षणाची मोठी भ्रांत खाण अवलंबितांना लागून राहिली आहे. आता दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे या बंद शैक्षणिक सुविधा त्वरित सुरू कराव्यात अशी जोरदार मागणी खाण अवलंबितांकडून करण्यात येत आहे. 

खाण कंपन्यांचा व्यवसाय आता सुरू झाला आहे. खनिज मालातून या खाण कंपन्यांनी बक्कळ कमावले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासाठी या खाण कंपन्यांनी योगदान देणे आवश्‍यक आहे. मुख्यमंत्री खुद्द खाण पट्ट्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने खाण व्यवस्थापनांना मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

खाण भागात बस वाहतूक अपुरी

कोरोना महामारीनंतर राज्यातील प्रवासी बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र बहुतांश बसगाड्या अजूनही बंदच आहेत. प्रवासी कमी असल्याने बसगाड्यांचा खर्च परवडत नसल्याचे बसमालक सांगतात. बसचालक व वाहकाचा पगार, इंधन खर्च, नित्य बसगाडीचा खर्च आणि वाहतूक खात्याचे कर यामुळे बसगाडी चालवणे मुश्‍किलीचे ठरले असल्याने बंदच ठेवणे योग्य असल्याचे मत बसमालकांनी व्यक्त केले आहे. ग्रामीण भाग तसेच खाण भागात पंधरा मिनिटांनी एक बसगाडी असायची ती आता एक तासाच्या अंतराच्या फरकाने येत असल्याने शाळा, कॉलेजात विद्यार्थ्यांना कसे काय पाठवायचे, असा सवाल पालकांनी केला आहे. त्यामुळे खाण भागात निदान खाण कंपन्यांकडून बंद केलेली सुविधा पुन्हा सुरू करताना आणखी नवी वाहनेही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी खाण   कंपन्यांनी उपलब्ध करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

वर्ग सुरू व्हायलाच हवेत
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करणे ही काळाची गरज होती. कारण ऑनलाईन शिक्षण पद्धती ग्रामीण भागात फोल ठरली आहे. आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे, त्यामुळे दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय योग्यच आहे.
- सुहास नंदा नाईक (अवंतीनगर तिस्क - उसगाव)
 

प्राथमिक शाळा नको...
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले ते ठीक झाले. कारण या दोन्ही परीक्षा मंडळाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. पण दहावी बारावीचे वर्ग सुरू केले तरी प्राथमिक वर्ग सुरू करता कामा नयेत. गर्दी झाली तर कोरोनाचा धोका अधिक संभवणार आहे.- सुनील शिवा गावकर (डिगणे - होंडा)

संबंधित बातम्या